Tuesday, November 25, 2014

छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी.

आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी.
शून्यातून स्वराज्य निर्माण केलेले हे असामान्य व्यक्तिमत्व.
राजा कसा असावा ? या प्रश्नाचे हे राजस उत्तर !
राजांनी केलेली काही असामान्य कामे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ !
युरोपियन सेनानींच्या विषय लंपट पार्श्वभूमीवर,
पराक्रमी असूनही प्रचंड उत्तुंग चारित्र्याचा महामेरू.
शत्रूला आपल्या कक्षेत आणून पराभव करणारा,
जगातील पहिल्या क्रमांकाच्या  प्रतापगड युद्धाचा सरसेनापती.
भारतीय समाजात चैतन्य फुलविणाऱ्या,
हिंदू सिंहासनाची पुनर्स्थापना करणारा पुरुषोत्तम.
मुघलांच्या जिहादी अधर्म युद्धाविरुद्ध,
गनिमी कावा या नवयुद्ध शास्त्राचा  जनक.
तलवारीचे पाते अर्धा हात लांब करून,
शत्रूची साडेतीन हात कबर खणणारा नवशस्त्र शिल्पी.
युरोपियनांच्या पांढऱ्या पायांना पळविण्यासाठी,
बलाढ्य सागरी आरमाराची निर्मिती करणारा भविष्यवेधी.
स्वदेशी  अर्थनीती बलवान करण्यासाठी,
होन हि स्वतः ची नाणी तयार करणारा अर्थनीतीद्न्य.
दणकट किल्ल्यांची उभारणी करतांना,
सह्याद्रीलाच अभेद्य किल्ला बनविणारा अभियन्तोत्तम.
संस्कृतोद्भव भाषांच्या संवर्धनासाठी,
राज्य व्यवहार कोशाची रचना करणारा संस्कृती संवर्धक.
डोक्यावरून मैला नेणे बंद करण्यासाठी,
पहिल्यांदा किल्ल्यांवर संडास बांधणारा  समाजसुधारक.
धर्मांधांनी मुद्दाम  मोडलेली देवळे,
पुन्हा त्याच ठिकाणी उभारणारा समाज उद्धारक.
प्रतापरावाचे परावर्तन करून,
त्यास जावई करून घेणारा  धर्मरक्षक.
इतिहासालाही अज्ञात असलेले,
हेरखाते बाळगणारा चलाख राजेंद्र.

राजांच्या मृत्युनंतर पाच लाखांची क्रूर सेना घेऊन, सगळे अनुकूल  असलेला धर्मांध
औरंगजेब लढाईसाठी दक्षिणेत उतरला. राजाच  नसलेल्या दीड लाख मराठी सेनेने
प्रतिकूल परिस्थितीत, हा लढा पंचवीस वर्षे चालविला. औरंगजेबाला दक्षिणेतच
गाडला. संगठनशीलतेचे हे परमोच्च उदाहरण आहे.
राजाधीराजांना परम आदराने वंदन करताना मनात येते !

तव शौर्याचा  जरा अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे
तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे |
त्या दिप्तीतून दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पानिपत 
पुन्हा लिहाया अमुचे भारत, व्यास वाल्मिकी येतील धावत || 

Monday, January 20, 2014

१. दादरा व नगर हवेली सशस्त्र मुक्तीसंग्राम.

            १. दादरा व नगर हवेली सशस्त्र मुक्तीसंग्राम.


     रोमांच ! होय अक्षरशः काटाच उभा राहिला अंगावर ! आणि का नाही उभा राहणार ? प्रत्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते . आणि आम्ही ऐकत होतो . याची देही याची डोळा अनुभवलेला अद्बूत प्रसंग . अविस्मरणीय क्षण . भारतीय स्वातंत्र्योत्तर लढ्याचे एक लखलखते तेजस्वी पान .
     आझाद हिंद सेनेने स्वातंत्र्य युद्धाचे एक सोनेरी पान लिहिले होते . आपण कोहीमाला गेलो  तर तेथे तो स्तंभ आपल्याला दिसत असतो  . त्यावरील ओळी दिसत असतात . आपण वाचत जातो . त्या काळात प्रवेश करीत जातो . आणि आपला पुरुषार्थ  लख्खपणे समोर उभा रहातो.
When you go home,
Tell them of us and say.
For your tomorrow,
We gave our today.
     दोन ऑगस्ट ची पहाट .  झुंजूमुंजू झालेले न झालेले ! वापिचे रेल्वे स्टेशन . सुनसान, कोणीही नसलेले . डोळ्यात बोट घातले तरी काळोखालाही न दिसणारा अंधार ! आणि ढगाचे जणू दोन तुकडे झाल्याप्रमाणे धो धो कोसळणारा पाऊस ! सोबतीला विजांचे रौद्र संगीत ! भीषण ! भयप्रद !
     लहानशी शिट्टी जाणवेल न जाणवेल अशी . धुराचा लोट पावसात मिसळत रेल्वे आली . थांबली . खाणाखुणा झाल्या आणि  काहीजण दबत दबत रेल्वेत मिसळले . आपापली शस्त्रे सांभाळत . कोसळणाऱ्या पावसालाही कळू न देता .
      १९५४ भारत स्वतंत्र होऊन सात वर्षे झालेली . ब्रिटीश निघून गेलेले .  पाठोपाठ फ्रेन्चांनीही गाशा गुंडाळलेला . पण पोर्तुगिज गोचीडा सारखे डसलेले . भारतमातेचे रक्त शोषण्यात धन्यता मानलेले . हे गोचीड उपटायचे . मुळासकट फेकून द्यायचे . ४९१ स्क्वेअर  मिटरांचा हा भारतीय प्रदेश मुक्त करायचा . आणि म्हणूनच हा दादरा व नगर हवेली लढा . आझाद गोमंतक दल आणि देशभक्त भारतीय यांचा सशस्त्र मुक्तीसंग्राम.
     लवेच्या गावी हेमवंतीबाई नाटेकर यांच्या वडिलांचा आश्रम होता . नाना काजरेकर व राजा वाकणकर तिथे गेले . त्यानी गुप्तपणे माहिती काढायला सुरुवात केली . २ माशिनगन्स, ६ स्टेनगन्स, २०० रायफल्स व सोबतीला भरपूर दारुगोळा असलेले सिंहवास, सेल्वासा ठाणे . विरुद्ध गावठी शस्त्रे घेतलेली पण प्रखर देशभक्तीने भरलेली १०७ मने . मनात एकच संकल्प . सावरकरांच्या शब्दांचा ' हे काय बंधू असतो जरी सात आम्ही । त्वस्थडीलीच दिधले असते बळी मी । ' विजय कोणाचा ?  शस्त्रांचा की देशभक्तीचा ?

     सैनिकांच्या ३ तुकड्या केल्या . ठाण्याच्या तीनही बाजूनी त्या पांगल्या . आमची आक्रमणाची वेळ जवळ येत चालली . मन फडफडू  झाले . हृदय धडधडू लागले . छातीचे ठोके कानामध्ये शिरू लागले . इशारा झाला आणि आम्ही पुढे सरकू लागलो . बाबाराव भिडे यांनी गणेश चतुर्थीचे एटोम बोंम दिले होते . पंचवीस पंचवीस पावलांवर ते लावायचे होते . बॉमची वात सारखी केली  . काडीपेटी काढली तर पाण्याने ओलीचिंब भिजलेली .
     करायचे काय ? दूरवर एक घर दिसत होते . त्या घराकडे गेलो . दारावर थाप मारली . एका माणसाने दार उघडले . समोर खाकी कपड्यातील बंदुक घेतलेला मी .  मला पाहताच तो पांढरा फटक.  धावायलाच  लागला . पेंट अडखळली एका दगडाला आणि घातला साष्टांग नमस्कार . तोंडावरच आपटला तो . खिशातली काडीपेटी पडली ती नेमकी माझ्यासमोर . ती घेऊन विनाविलंब तुकडीत सामील झालो .
     तीनही बाजूंना बंदुकांचे, शू S S , बोमांचे आवाज ऐकू येत होते . पोलिस ठाणे जवळ  येऊ लागले . बलिदानाच्या कल्पनेने अंग शहारून उठले . बाहु फुरफुरू लागले . वन्दे मातरम असे नुसते तोंडानेच म्हणत होतो . आज प्रत्यक्ष कृतीची वेळ होती . विवेकानंदांनी म्हटलेय ना ' उत्तीष्ठतः जागृत प्राप्य वरान्नीबोधत । '
     दीर्घ शिट्टी झाली . धाड धाड धाड ! झाडाआडून उद्या पडायला लागल्या . पोलिसांना काय करावे तेच समजेना . एक पोलिस धीर करून पुढे येऊ लागला . थांब ! नाना सोनावणे ओरडला . पोलिस थांबेना . काय झाले काही कळलेच नाही . क्षणार्धात घडले ते . नानांनी उडी घेतली ती खिडकीतून थेट त्या पोलिस स्टेशनाच्या आत . जपानी मेकची संगीन त्या शिपायाच्या छातीतून आरपार करत .
    रडत ओरडत सगळे शिपाई शरण मागत होते . बंदुका डोक्यावर घेऊन गुढग्यावरुन रांगत होते . प्राणाची भिक मागत होते . आम्ही त्यांना पकडले . दोरीने बांधले . एका खोलीत नेउन कोंडले . बाहेर आलो . विजयाच्या घोषणा देऊ लागलो . भारत मातेचा जयजयकार करू लागलो . धनाजी कुरुङ्गळे याने पोर्तुगीज झेंडा खाली घेतला . प्रभाकर सिनारीने तो मातीत टाकला . आपल्या बुटाच्या पायांनी तो त्याला तुडवू लागला . त्यावर नाचू लागला . साडेचारशे वर्षांच्या गोवेकरी रागाचे, आतल्या आत धुमसणाऱ्या प्रतीशोधाचे ते प्रकटीकरण होते .
     आम्ही रांगेत उभे राहिलो . आपला भारतीय तिरंगा वर चढविला . वारा वाहत होता . ध्वज फडकत होता . तन मन धन पूर्वक आम्ही गर्जत होतो . भारतमाता की जय ! भारतमाता की जय !

मुझे तुम तोड लेना वनमाली,
उस पथ पर देना फेंक ।
मातृभूमी पर शीश चढाने,
जिस पथ जाये वीर अनेक ।। 

      
     
     




विवेकानंद - उठा राष्ट्रवीर हो !

                                                   
                                                                           उठा राष्ट्रवीर हो ! 

     स्वामी विवेकानंद हे भारतमातेला पडलेले लोभस स्वप्न . भारतीय अभुदयाच्या पूर्वसंध्येला नियतीने काळाची गरज ओळखून भारतमातेला ते दिले. अंधार पुसट होऊ लागला आणि परमेश्वराने आपली कूस बदलली . 
    विवेकानंद जन्मजात मेधावी आणि कृतीशील . नित्य नव्या शोधात असलेले प्रतिभावान व्यक्तिमत्व . स्वामी रामकृष्ण यांच्या सहवासात ते आले. त्यांनी या हिऱ्याला पैलू पाडले . सगळ्यांच्या लक्षात आले ते शिकागो परिषदेत . विवेकानंदांचे भाषण ऐकल्यानंतर . हा होता एका झंझावाताचा शुभारंभ . 
     विवेकानंदांच्या डोळ्यांसमोर नेहमी राहिला तो तरुण, युवा, युथ ! युग बदलयचेय आपल्याला !  वेदांत म्हटले आहे ' अशिष्टो बलिष्टो दृढिष्टो मेधावी ' म्हणजेच ' दृढ बलशाली , तीव्र बुद्धीची आणि चैतन्यशाली माणसेच ईश्वराजवळ पोहोचू शकतात .' तुमचा भविष्यकाळ निश्चीत करण्याची हीच वेळ आहे. म्हणूनच मी म्हणतो,आताच या उसळत्या तारुण्यात, या नव्या उत्साहाचे वातावरणातच  कार्य करा . काम करण्याची हीच वेळ आहे .आताच आपल्या भाग्याचा निर्णय करा आणि कामाला लागा .कारण जे पुष्प अजून चुरगळलेले नाही, जे ताजे आहे, जे अद्याप हुगले गेलेले नाही तेच ईश्वरचरणी अर्पण केले जाते .ईश्वर त्याचाच भुकेला असतो .
     भूतकाळातून भविष्याचे निर्माण होते .म्हणून जितके मागे पाहता येईल तितके मागे पहा .तुमच्या मागे जो अनंत जीवनप्रवाह आहे त्याचे यथेच्च  प्राशन करा , आणि पुढे पहा .पुढे चला आणि भारताला पहिल्यापेक्षा अधिक उन्नत करा . आपले पूर्वज महान होते याचे प्रथम स्मरण करा . आम्ही प्रथम त्या तत्वांना समजले पाहिजे ज्यामुळे आम्ही बनलो आहोत . त्या रक्ताला समजले पाहिजे कि जे आमच्या नसानसातून वाहत आहे .आम्हाला त्या रक्तावर व त्या रक्ताने भूतकाळात जे केले त्यावर विश्वास ठेवला पाहिजे . भूतकाळातील ती श्रेष्ठता व चेतना , त्यासंबंधी आमची आस्था या भरवशावर आम्हाला पहिल्यापेक्षा अधिक भव्य व अधिक दिव्य भारत निर्माण करायचा आहे .
   स्वामीजींना शंभर युवक हवे होते ! शंभर टक्क्यांना बदलणारे ! ' काही थोड्या लोकांनी तरी उठून उभे राहावे आणि म्हणावे की, परमेश्वराखेरीज आम्हाला अन्य ईप्सित नाही. जगासाठी धर्मजागरण करणे हेच आमचे जीवितकार्य. असा त्याग तुम्ही करू शकत असला, तर दृढपणे उभे रहा. हे धर्मयुद्ध आहे. यात शंभर योद्धे जरी कोसळले तर त्यांच्या हातीची ध्वजा घ्या आणि ती पुढे न्या. जो पडतो त्याने आपल्या हातीची ध्वजा दुसऱ्याच्या हाती द्यावी. ती काही कधी खाली येणार नाही. कोणीही पडले तरी ईश्वरी सत्ता अढळ राहणार आहे. '
      चरित्र्यसंपन्न, बुद्धीसंपन्न आणि लोकसेवेसाठी सर्वस्व समर्पण करणारे युवक हवेत. माझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्राणही ओवाळून टाकण्याची सिद्धता असलेल्या आणि त्याद्वारे स्वतःचे आणि संपूर्ण देशाचे कल्याण करू शकणाऱ्या आज्ञांकित युवकांवरच माझ्या भविष्यातील आशा केंद्रित झाल्या आहेत. सर्वसामान्य मुले माझ्याकडे येतच असतात. त्यांच्या मुद्रांवर तेज नसते, त्यांच्या हृदयात उत्साहाचा अभाव असतो, त्यांची शरीरे दुर्बळ, कुचकामी असतात आणि मनात धैर्याचा लेशही नसतो. अशांकडून काय काम होणार? नचिकेताची श्रद्धा असलेले बारा युवक मला मिळाले तर या देशातील विचारांना आणि कार्याला मी नवी दिशा देऊ शकेन.
     विवेकानंद म्हणाले, ' आपल्या भविष्याचे शिल्पकार आपणच व्हा . भूतकाळात जे होऊन गेले त्याचे स्मरणही ठेऊ नका . असीम भविष्यकाळ आपल्यापुढे आहे . लक्षात ठेवा , तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द , केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते . दुष्ट विचार आणि दुष्ट कृती या तुमच्यावर झडप घालायला वाघासारख्या टपलेल्या असतात . तसेच शुभविचार , शुभकृत्ये यांच्या अनंत शक्तीही तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, साहाय्य करण्यासाठी सदैव सिद्ध असतात . 
     सुशिक्षित तरुणांमध्ये कार्य करा, त्यांना एकत्र आणा, त्यांची संघटना करा. श्रेष्ठ त्यागातूनच श्रेष्ठ कार्य उभे राहते.माझ्या शूर, गुणी, मुलांनो ! आपल्या योजनांवर काम करण्यासाठी स्वतःची सर्व शक्ती वेचा ! एखादा चित्रकार चित्र रंगविताना इतका तन्मय होतो की, त्याला स्वतःचे सुद्धा भान राहात नाही . असा चित्रकारच श्रेष्ठ कलाकृतींना जन्म देऊ शकतो . ईश्वराशी जो योगबळाने एकरूप झाला तो आपले सर्व काम अत्यंत एकाग्रतेने करतो आणि व्यक्तिगत लाभाची काहीच अपेक्षा करीत नाही, अशा कर्मातून जगाचे नेहमी भलेच होत असते . वाईट काही होणे शक्यच नाही . गीता म्हणते की, आपली सर्वच कर्मे अशा रीतीने ' स्व ' ला विसरून झाली पाहिजेत . 
     नाव,कीर्ती,किंवा असल्या क्षुद्र गोष्टींच्या मागे लागू नका. झोकून देऊन काम करा. लक्षात ठेवा, ' सुके गवत जेव्हा दोरखंडात गुंतले जाते तेव्हा त्यामध्ये पिसाट हत्तीलासुद्धा बांधून ठेवण्याचे सामर्थ्य येते.   कोणत्याही एका ध्येयाचा ध्यास घ्या . त्यासाठी जीवन अर्पण करा . ते ध्येय इतके मोठे असावे, इतके उत्कट असावे, त्यापुढे अन्य सर्व गोष्टी विरघळून जाव्यात . त्याशिवाय इतर कशाला जीवनात जागाच राहू नये . वेळच राहू नये . 
    तुम्ही दिव्यत्वाचे अंश आहात . त्यामुळे श्रेष्ठतम गोष्टी तुमच्या चरणांशीच  आहेत . तुमचे स्वरूप इतके शक्तिमान आहे की, आकाशांतल्या सर्व तारकांचे तेज ओंजळीत घेऊन तुम्ही पिउन टाकाल . शक्तिमान व्हा ! सर्व अंधश्रद्धा दूर करा आणि मुक्त व्हा ! 
     गरीब , अज्ञानी आणि दलित यांच्या बद्दल सहानुभूतीचा आणि त्यांच्या उन्नतीसाठी सतत कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा वारसा मी तुम्हाला देत आहे . जे गरीब आहेत , जे दलित आहेत ,जे खालच्या जातीचे समजले जातात त्यांच्यासाठी कष्ट  करा . बलिदान करा .आपल्या संपूर्ण जीवनाचे बलिदान करा .बंधुनो ! आपण सर्वजण सतत कार्य करू या ! हि झोप घेण्याची वेळ नाही . भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे . भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे . उठा ! जागे व्हा आणि आपल्या ह्या भारतमातेला तिच्या त्या शाश्वत सिंहासनावर पुनः विराजमान झालेली पहा .
      तिच्यात नवचैतन्याचा संचार होऊ द्या . आणि पूर्वी कधीही तिला लाभले नसेल अशा अपूर्व तेजाने ती परत तळपू द्या .
 हे वीर आत्म्यांनो, ज्यांना बेड्यांनी जखडून टाकले आहे, त्यांना मुक्त करण्यासाठी, जे दुःखाच्या भाराने लादले गेले आहेत त्यांचे ओझे कमी करण्यासाठी आणि जे अज्ञानाच्या घनघोर अंधारात बुडून गेले आहेत अशांची हृदये प्रकाशित करण्यासाठी पुढे चला ! ऐका ! वेदांत डंका पिटून घोषणा करीत आहे ' अभिः ' निर्भय बना . ईश्वराची हि पवित्र वाणी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्या हृदयाची तर छेडण्यास समर्थ होईल .
       स्वामी विवेकानंदांच्या समोरचे ध्येय स्पष्ट होते . ते स्वतः पाहताना, त्याचा परिसस्पर्श तरुणांना देताना ते म्हणतात, '  मी भविष्यात डोकावून पहात नाही.तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात उभे राहते. हि प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवासह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. शान्तिमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करूया ! '
  



Sunday, November 24, 2013

स्वातन्त्र्योत्तर युद्धकथा १

                स्वातन्त्र्योत्तर युद्धकथा १

सदैव सैनिका पुढेच जायचे,
न मागुती तुला कधी पहायचे ।
     शाळेमध्ये असताना कविता पाठ केली होती . आणि आज खरेच मागे न बघता पुढे जात होतो . १२ नोव्हेंबरची दुपार . वालोंग या चार हजार फुट उंचीवर असलेल्या ठिकाणी आम्ही होतो.  एकत्र येण्याचा हुकुम झाला आणि आहे त्या स्थितीत आम्ही धावत पळत एकत्र जमलो . ' आपल्याला ' ट्राय जंक्शन ' वर हल्ला करायचा आदेश आलाय . आत्ता ताबडतोप आपण निघत आहोत . चौदा हजार फुट उंचीवर जाऊन उद्या रात्री आपण हल्ला करीत आहोत . '
     ब्रिगेडियर म्हणाला खरा पण आम्ही मात्र त्याच्या कडे वेड्यासारखे बघत होतो . चौदा हजार फुट उंचीवर जाऊ आम्ही ! पण ताबडतोप हल्ला कसा शक्य आहे ? सगळे जण एकमेकांकडे बघत होते . काहीजणांनी शंका व्यक्त केली . हल्ला कसा शक्य आहे ? ब्रिगेडीयरने एकच वाक्य म्हटले . ' उद्या रात्री आपण हल्ला करीत आहोत . ' अधिकारयाची इच्छा म्हणजे शेवटी आज्ञाच ना !
     आम्ही चालायला सुरुवात केली . चारही बाजूला डोंगरांचे सुळकेच  सुळके.  देवदारांची झाडे . पायथ्याशी दाट, माथ्यावर विरळ होत गेलेली . शिखरांवर बर्फ साठलेले . सूर्यप्रकाशात चकाकणारे . खाली बघितले तर मधून मधून लोहित नदी दिसे . पांढरया रेषेसारखी . मन मोहून टाकणारे दृश्य . पण पाहता न येण्याजोगे . अक्षरशः उभा डोंगर ! पाय चुकला तर ? पूर्ण कपाळमोक्षच .
     रात्र झाली . काळोख पसरला . पण टोर्च पेटवायचा नाही . शत्रूला संशय येत कामा नये . चढाई मंदावली . पण सुरक्षितता वाढली . संपूर्ण रात्र आम्ही चालत होतो . पहाट झाली . शिखारांवरती सूर्याची किरणे पसरू लागली . अतिपूर्वेकडील ती किरणे . दरयामध्ये मात्र निळसर काळोखच ! भारतातले लोक मात्र अजून साखरझोपेत असतील !
      ट्राय जंक्शनला आलो . आमच्या दोन्ही बाजूंना ' यलो पिंपळ ' आणि ' ग्रीन पिंपळ ' या ठाण्यावर हल्ला करायचा .चिन्यांना जिकायचे . आमचे बाहू फुरफुरू लागले . पण हे युद्ध होते . येथे उतावीळपणा नडला असता . आम्ही आणि चीनी यांच्यात केवळ अर्ध्या किमीचे अंतर असेल . त्यांना आमची काहीच कल्पना नव्हती . ते आपले झाडे तोडण्यात,  खंदक तयार करण्यात गुंग झालेले . आपापसात मोठमोठ्याने बोलत असलेले .
     आता विश्रांती . थोडे खंदक,खड्डे यांची तयारी . मनात विचार चाललेला होता . इतक्यात वायरलेस वाजू लागला . ' हेलो, ब्रेव्हो, पापा रिपोर्ट माइन ओव्हर ' कमांडर ओफिसरने उत्तर दिले . ' रिपोर्ट ओव्हर ' सूचनांची देवाण घेवाण सूरु झाली . बातमी थडकली . आता लवकरच १० वाजता हल्ला करायचा . दिवसाच धडक द्यायची .
     आम्ही आमची घड्याळे लावून घेतली . हेवरसेक भरल्या . जड सामान उतरून ठेवले . अत्यंत सावधगिरीने, शत्रूला जराही सुगावा लागू न देता चालायला सुरुवात केली . कधी झटक्यात, कधी नागमोडी, कधी गुढग्यावर तर कधी कोपरांवर क्रव्लिंग करीत आम्ही पुढे सरकत होतो . वाटेत चीनी सैनिकांनी माईन्स, सुरुंग लावलेले नाहीत ना याचीही खात्री करून घ्यावी लागत होती . अगदी शत्रूच्या नाकासमोर जाऊन आम्ही ठाण मांडले .    
      भारतीय सैन्याचे एक वैशिष्ट्य आहे . इथे अधिकारी केवळ आज्ञा देत नाहीत . धुमश्चक्रीच्या वेळी ते सर्वात पुढे असतात . म्हणूनच ते युद्ध जिंकतात ना ?  मी थोडा पुढे जाऊन बघण्याचा प्रयत्न करू लागलो . सुभेदार गोविंदसिह माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करू लागले . मी त्यांना येऊ नका असे सांगत होतो . पण . . .  चिन्यांनी त्यांना पहिले आणि क्षणार्धात माशिन्गंस धडधडल्या . आग ओकू लागल्या . गोविंदसिह धारातीर्थी पडले होते . जणू ते म्हणत होते .  ' हे काय बंधू असतो जरी सात आम्ही । त्वस्थडीलीच दिधले असते बळी मी । '
     दुखः व्यक्त करायला वेळ होताच कोठे ? मी मागे संदेश पाठविला ' चीनी सावध झालेत . अधिकारयानी निर्णय घेतला आणि भारतीय सैन्याने आक्रमणाला प्रारंभ केला . अत्यंत विषम परिस्थिती . आम्ही एक तर चीनी पाच . त्यांची शस्त्रेही अत्याधुनिक . तरिहि आम्ही भारी पडत होतो . माझ्या प्लेट्यूनचा लान्सनाईक देवदत्त डोळ्यात खून उतरलेला . ' साब मुझे जाने दो ! चार-पाच चीनी तो मुझे मारनाही चाहिये । ' आणि धावला वेडा .
     इकडे मीही सरकत होतो . एका मोठ्या झाडाचा आधार घेत जात होतो . चीनी गोळ्या शरीराजवळून सुसाट जात होत्या . तोफांचे गोळे झाडांच्या फांद्या, छोटी झुडुपे तर पूर्ण उखडून टाकीत होत्या . आणि अकस्मात मार्याच्या टप्प्यात एक चीनी दिसला . संधी थोडाच सोडणार मी ? झाडली गोळी . चीनी मेला पण शत्रूला माझा सुगावा लागला . माझे झाड आगीने भाजले जाऊ लागले . गोळ्यांचा अक्षरशहः वर्षाव . त्या वर्षावाने झाडाची साल तर सोडाच खोडाचेही तुकडे माझ्या अंगावर पडू लागले . आजूबाजूने आवाज येऊ लागले ' अरे चवानसाब मर गया । अरे चवानसाब मर गया_ '
     युद्धाचे काही संकेत असतात . पुढे नाही जाता आले तरी आहे तेथे दृढ टिकून राहायचे . मोर्चा सोडायचा नाही . आम्ही तसेच केले . आणि ' यलो पिंपळ ' वरून आम्ही चिन्यांना हुसकून लावू शकलो . आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे ठाणे आम्ही तोफखान्याची मदत न घेता जिंकले . बिरबल म्हणत असे ' शस्त्र कोणते श्रेष्ठ ? जे वेळेवर हाती मिळेल ते ! '  ' नेपोलियन नेहमी सांगे ' युद्धात शस्त्र लढत असते, पण त्यापेक्षा खरे लढते ते मन, हृदय ! ' मला कवीच्या त्या फुलाची आठवण आली  
मुझे तुम तोड लेना वनमाली,
उस पथ पर देना फेंक ।
मातृभूमी पर शीश चढाने,
जिस पथ जाये वीर अनेक ।। 
    
     
     





Saturday, January 19, 2013

गीत विवेकानंद - १

११
हे वीर विवेकानंद
हे वीर विवेकानंद हिंदुयशमूर्ती
हे युवक प्रवर तू युवहृदयांची स्फूर्ती।।धृ।।
दास्यात पाहुनी विश्वधर्मजननी ही
तू क्षुब्ध सिंहसा व्याकुळ अंतर्यामी
मुक्तीचा तिचिया ध्यास तुला दिनराती।।१।।
शत-आघातांनी कुंठीत मूर्च्छित झाली
ती हिंदुचेतना फिरूनी तू चेतविली
तिज उन्नत मस्तक निर्भय केले जगती।।२।।
स्मरतात तुझे ते घनगर्जितसे शब्द
मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद
जग जिंकायाची ईर्षा दाटो चित्ती।।३।।
तव अमृतवाणी हाक देत आम्हाते
रे अतुलबलस्वी करू हिंदुराष्ट्राते
युवशक्ती हवी मज कार्य शरण पुरूषार्थी।।४।।
जी जीवनपुष्पे सतेज नवरक्ताची
स्थापावा त्यांनी धर्म-आत्म अर्पुनी
त्यानेच अर्चना होत राष्ट्रदेवाची।।५।।

विवेकानंदांची गोवा भेट

पहाट होत होती. क्षितिजावर भगवी उषा पसरत  होती. गोमंत पर्वता आडून उदीयमान हिरण्यगर्भ   वाकुल्या दाखवत प्रकट होत होता. उत्तर रात्री कधीतरी पडलेल्या पावसाने न्हालेला  हिरवागार  झाडोरा  अजूनही ठिबकत होता. थेंबामधून सूर्यकिरणांना परावर्तीत करीत  सहस्र रश्मी बनवत होता. आगगाडी आपल्या संथ लयीत चालली होती. नागमोडी वळणे घेत, बोगदे पार करीत उतरण उतरत होती. दोन्ही बाजूंना लावलेली इंजिने ठराविक वेळी आपापल्या  शीळा  फुंकीत  होती. डोंगर  दरयानमधून त्यांचा मंद प्रतिध्वनी येत  होता. विवेकानंदांनी निमिषभर डोळे झाकले, उघडले. आणि..... आणि ..... उजव्या खिडकीतून टपकन रानफुलाची  पाकळी टपकली. गोव्याच्या भाषेत सांगायचे म्हणजे कौल झाला होता. 

गोव्याला येण्यामागे  स्वामीजींच्या डोळ्यासमोर दोन  प्रमुख उद्देश्य   होते. पहिला देवदर्शन ! दक्षिण काशीतल्या देवतांचे दर्शन ! आणि दुसरा ख्रिश्चन मताचा अभ्यास! स्वामीजींचा मुक्काम बेळगावला होता.
बेळगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्री. विष्णुपंत  शिरगावकर  यांच्याशी  त्यांचा  परिचय  झाला.  बोलता  बोलता गोव्याचा विषय निघाला. स्वामीजींच्या मनात गोव्याला जायचा विचार आहे हे विष्णुपन्तांच्या
लक्षात आले.स्वामीजींच्या प्रवासाची व्यवस्था करायचे त्यांनी ठरविले. मडगाव शहरामधील विद्वान सद्गृहस्थ  श्री.  सुब्राय नायक यांच्याशी त्यांचा परिचय होता. विष्णूपंतानी  सुब्राय नायकांना पत्र  पाठविले. स्वामीजींचा परिचय व उद्देश्य लिहून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. विविध विषयांचे सखोल ज्ञान, समाजसेवेची तळमळ व उदीयमान पत्रकारिता यांचा व्यासंग अशा बहुश्रुत सुब्रायजीनी त्यांची विनंती सहर्ष स्वीकार केली.

 श्री. सुब्राय नायकांचे घराणे  हे मडगावातील प्रमुख प्रतिष्ठित  घराणे. पोर्तुगीज अत्याचार, बाटवा बाटवी, द्वेषमूलक कायदेकानून यांच्यातून मार्ग काढीत स्वधर्म रक्षण करणारे. गोव्यात हिंदू  धर्मावरील  पहिला पोर्तुगीज आघात सासष्टी तालुक्यात झाला होता. रायतुरचा  किल्लेदार  दियोगु  रुद्रीगीश  याने   साडेतीनशे देवळांचा विध्वंस केला होता.मडगांव शहरात धार्मिक स्थळाची उणीव भासू लागली.  साहजिकच धर्मप्रेमी नायक कुटुंबीयांनी  मडगावचे  ग्राम दैवत श्रीदामोदार  यांच्या पूजा अर्चेसाठी आपल्या घरातील एक मोठी खोली आज ज्याला साल म्हणतात, ते हिंदुना उपलब्ध करून दिले.  धार्मिक  विधींना सुरुवात झाली. आजही श्रीदामोदाराची नित्यपूजा तेथे मोठ्या  भक्तिभावाने केली जाते.

२७ ओक्टोबर १८९२ ! मडगावचे रेल्वे स्टेशन ! शेकडो लोकांचा जमाव तेथे जमला होता. आतुरतेने स्वामीजींची वाट पहात उभा होता.  मडगांव मधील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत श्री सुब्राय नायक स्वामीजींच्या स्वागताला स्वतः उपस्थित होते. रेल्वेचे आगमन झाले. स्वामीजी खाली उतरले. काषाय वस्त्रधारी ते  तेजः पुंज धिप्पाड व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर  विद्वत्तेचे तेज,  धृढनिश्चयी मुद्रा, परतत्वाचा वेध घेणारी नजर ! ते आले  त्यांनी  पाहिले आणी त्यांनी  जिंकले हे वेगळे सांगायला हवेय ?

श्री सुब्राय नायक यांनी स्वामीजींना आपल्या  घोडा गाडीत  बसविले.  मोठ्या सन्मानाने मिरवणुकीने आपल्या घरी नेले. कोंब वाड्यावरील आपल्या पिढीजात घरात त्यांनी स्वामीजींच्या राहण्याची व्यवस्था केली. सालाशेजारची खोली त्यांना देण्यात आली आणि स्वतः जातीने त्यांची सोय सुविधा  ते बघू लागले.
स्वामीजींची ध्यान धारणा, चिंतन, देवदर्शन,भेटीगाठी  यांची व्यवस्था करू लागले. प्रतिष्ठित लोक भेटायला येत. चर्चा करीत. भारावल्या स्थितीत पूर्ण संतुष्ट होऊन घरी जात. धर्म, मीमांसा, षड्दर्शने, लेखन,  समाजसेवा  विषयांची  समा  जुळल्याने  श्रोत्यांच्या  दृष्टीने ' सोनियांचे दिनु  बरसे अमृताचे घनु ' ठरल्यास नवल ते काय!

देवदर्शनासाठी स्वामीजी  फोंड्याला गेले. कवळेला श्रीशान्तादुर्गेचे दर्शन त्यांनी  घेतले. गोव्याच्या मातीला संगीताचा वास आहे. साहजिकच  इथे येणाऱ्याचा श्वास लयकारणारच ! सहजपणे स्वामीजी  देवळात  मांडी घालून बसले. जगदम्बेशी तद्रूप  झाले. त्यांना दुर्गा आठवली. विश्वजननी  कालीमातेचे भजन  ते गावू लागले. देवळात देवदर्शनाला आलेली  भक्त मंडळी सावरून बसली. स्वामीजींच्या मधुर आणि पहाडी आवाजाने ती मंत्रमुग्ध झाली. क्षणकाल का होईना आपल्या आराध्याला, शांतादुर्गा  देवतेला मूळ कालीरुपात अनुभवू लागली.

स्वामीजी मंगेशीला गेले. फोंड्याचा सगळाच भाग नितांत सुंदर. हिरवीगार शेते, पाचविचार कुळागरे! आणि त्याच्या साथीला त्या हिरवाईत, पाचुई कोंदणात वसवलेली देवालये. स्वामीजींनी श्रीमंगेशा समोर धृपद गायला. आपल्या मधुर रागदारीने उपस्थिताना तृप्त केले. जवळचे गाव
म्हाड्डोळ !  श्रीम्हालसा देवीचे स्वामीजींनी दर्शन घेतले. देवीसमोर त्यांनी एक सुंदर ख्याल गायला.
ते मडगावी परतले.  सालातही त्यांनी श्रीदामोदारासमोर एक चीज आळवली. तब्बल पाऊण तास ते ती चीज विविध रागातून गात होते. गोव्यातील संगीत दर्दिना आश्चर्यचकीत करीत होते.

पर्वतावर याच काळात लयसूर्याचा  उदय होत होता. खाप्रुमाम पर्वतकर ! वादनातील एक  अनोखा   चमत्कार  ! एका पायाने त्रिताल, दुसऱ्या पायाने झपताल, एका हाताने लय, दुसऱ्या हाताने चौताल
धरून तोंडाने सवारी म्हणत एकाच वेळी समेवर येणारा हा लयभास्कर . सुब्रायबाबानी खाप्रूमामांना बोलवून आणले. स्वामिजीसमोर त्यांचे वादन झाले. तरुण खाप्रूला वादनासंबंधी सांगताना स्वामीजी म्हणाले, ' लाकडी खोक्याच्या कडेवर बोटांनी वाजवत जसा आपण आवाज काढतो, तसा आवाज चामड्याच्या वरच्या थरातून काढला आला पाहिजे. '  खाप्रूला हे पटेना. त्याला वाटले स्वामीजी आपली थट्टा करतात. हलकेच तसे ते म्हणालेही. स्वामीजी आसनावरून उतरले. बैठक मारून त्यांनी तबल्यावरून  हात फिरविला. त्यांची बोटे तबल्यावरून फिरू लागली. दैवी आवाज सालात घुमू लागला. आपल्या वादनाने उपस्थितांना आ वासायला लावणाऱ्या  कलावंत खाप्रूचा वासलेला आ पहाण्याचे  भाग्य आज मिळाले होते. स्वामीजीच्या वादन कौशल्याने सगळेजण  थक्क झाले होते. खाप्रू मामानी स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांची क्षमा मागितली. आपल्या  उमेदीच्या,  उभारीच्या  अत्यंत तरुण वयात स्वामीजीशी संबंध येण्याचे भाग्य खाप्रू मामांना लाभले.

हिंदुत्व हा मानवी जीवनाचा प्राण ! मानवी जातीला मार्ग दाखविणारा  पथ  परीचायक  दीपस्थम्भ !  शतकानुशतके अनथक चालत आलेला. हल्लीच्या काळातील काही दुराग्रही पंथांनी त्याच्यावर आघात करायला सुरुवात केली होती. माझे मत खरे आहे, असे म्हणायला हरकत नाही. पण दुसरी मते, अन्य विचार खोटे आहेत असे प्रतिपादन केले जात होते. फेनेटिक उन्माद पद्धतशीररित्या पसरविला जात होता. याचाच एक शीर्ष बिंदू म्हणून शिकागो येथे सर्वधर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिश्चन मत जगावर लादण्याच्या
योजनेचाच तो एक भाग होता.

खंडन-मंडण यांची फार मोठी परंपरा लाभलेल्या या देशात परमताचा विचार, अभ्यास सहज केला जातो.
स्वामीजी हाच प्रमुख उद्देश्य घेऊन गोव्यात आले होते. श्री. सुब्रायबाबाशी आपला मानस त्यांनी  व्यक्त  केला. मडगाव पासून ७ किमी. अंतरावर  असलेल्या प्राचीन रायतूर किल्ल्याचे रुपांतर पोर्तुगीजांनी सेमिनारीत केले होते.  ख्रिश्चन मतप्रसार करणारे पंथप्रसारक, पाद्री तेथे तयार केले जातात. तिथल्या ग्रंथालयात ख्रिस्ती पंथविषयक अनेक उत्तमोत्तम पुस्तके होती . अत्यंत दुर्लभ  अशी  प्राचीन  हस्तलिखिते होती. लेटीन ग्रंथ होते. या पुरातन  ग्रंथांमधून ख्रिश्चन पंथाचा इतिहास व तत्वज्ञान यांचा अभ्यास  करणे. गोव्यातील समाजमनावर  झालेला धर्मपरिवर्तनाचा प्रभाव जाणून घेणे. आणि सात  किलोमिटरवर  जावून  मिळविलेल्या  माहितीच्या  आधारे  सात समुद्रापलीकडे  जाऊन  अर्वाचीन हिदुत्वाची आश्वासक  सिंहगर्जना  करणे.

मडगावचे सुप्रसिद्ध वकील श्री. जुझे फिलीप आल्वारीस यांना सुब्रायबाबानी आपल्या  घरी  बोलाविले. स्वामीजींचा  परिचय करून दिला.  त्यांचा मानसही बोलून दाखविला. स्वामिजींशी झालेल्या अल्पशा भेटीत, त्यांच्याशी झालेल्या चर्चेत  श्री. आल्वारीस अत्यंत प्रभावित झाले होते.  त्यांनी ताबडतोप सेमिनारीतील आपल्या एका प्रोफेसर मित्राची भेट घेतली. स्वामी विवेकानंदांची रायतुरच्या सेमिनारीत दोन दिवस राहण्याची सोय केली. ग्रंथालायातले प्राचीन ग्रंथ दाखविण्याची व्यवस्था केली.

स्वामीजी रायतूरला गेले. तिथल्या प्राचीन ग्रंथांचे ते अध्ययन करू लागले. हस्तलिखिते चाळू लागले. काही टिपणेही त्यांनी काढली. तेथील विद्यार्थी, शिक्षक, पादरी, त्यांचे प्रमुख स्वामीजींना कुतुहलाने बघत. फुरसतीच्या वेळी त्यांच्याबरोबर वार्तालाप करीत. विविध प्रश्न विचारीत. स्वामीजीची वेशभूषा, प्रगाढ ज्ञान, तीव्र स्मरणशक्ती, चौफेर व्यासंग यामुळे लोखंडाने चुंबकाला चिकटावे तसे सर्वजण आकर्षिले जात. शेकडो विद्यार्थी तिथे निवासाला असत. येशूच्या धर्माचे सार त्यांनी या विद्यार्थ्यासमोर ठेवले. एक भगवा संन्यासी येतो काय ! चारदोन पुस्तके चाळतो काय ! आणि वर्षानुवर्षे पंथ कोळून प्यालेल्याना त्यांच्याच पंथाचे मर्म सांगतो काय ! सगळेच स्तंभित करणारे.

साहजिकच श्री. सुब्राय नायकांच्या घरी विद्वानांचा ओघ सुरु झाला. ख्रिश्चन मंडळीही बरीच येऊ लागली. प्रतिष्ठित वकील,, बेरिस्टेर, जज, नायकांकडे येत. दूरदुरून पादरी मंडळीही येई.  स्वामिजीकडे मनमोकळेपणाने संवाद करीत. लेटीन, इंग्रजी, फ्रेंच अशा विविध भाषात हा संवाद चाले. स्वामीजीची  उत्तर देण्याची पद्धती त्यांना भावे. ते तिचे कौतुक करीत. सगळ्या धर्मांचे सखोल अध्ययन केलेला, बहुश्रुत, मेधावी असूनही अत्यंत साधा असा हिंदू  संन्यासी त्यांनी पहिल्यांदाच पहिला होता.

बघता बघता पंधरवडा उलटला. स्वामीजींची पुढच्या प्रवासाची वेळ जवळ आली. श्री. सुब्राय नायकांनी स्वामीजींच्या गौरवपर एका सभेचे आयोजन श्रीदामोदराच्या पटांगणात केले. उपस्थित वक्त्यांनी विवेकानंदांचे गुणवर्णन केले. त्यांच्या नियोजित कार्यात,सर्वधर्मपरिषदेत त्यांना यश प्राप्त होवो अशी कामना व्यक्त केली. बरीच पादरी मंडळीही या सभेस हजर होती.

श्री. हरिपद मित्र यांना पाठविलेल्या पत्रांत स्वामीजी लिहितात,  '' मी येथे सुखरूप येऊन पोहोचलो.येथे मी पणजी शहर पाहिले, तसेच काही खेडीही पाहिली. जवळपास असलेली काही देवळेही पाहिली. तिकडून मी आजच परतलो. गोकर्ण- महाबळेश्वर आदि स्थानांना भेट देण्याचा माझा मानस मी अद्याप सोडून दिलेला नाही. उद्या सकाळच्या गाडीने मी धारवाडला जाण्यासाठी निघेन.... पणजी हे टुमदार आणि मोठे स्वच्छ शहर आहे. येथील बहुतेक ख्रिस्ती लोक साक्षर आहेत. प्रायः सर्व हिंदू अशिक्षित आहेत. ''

श्री सुब्राय नायकांनी स्वामीजी कडे त्यांचे एक छायाचित्र मागून घेतले. आजही सालामध्ये त्याचे परिवर्धीत रूप आपल्याला पहायला मिळते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात स्वामीजी धारवाडला जायला निघाले. रेल्वे स्टेशनवर त्यांना निरोप द्यायला हिंदू तसेच ख्रिश्चन समाजातील प्रतिष्ठित लोक शेकडो नागरिकांसह आले होते.  रेल्वे दिसेनाशी होईपर्यंत साश्रू नयनांनी हात हलवत निरोप देत होते.

Sunday, April 1, 2012

सीता मला दिसलीच नाही.

प्रभू श्रीरामांनी सीतेला आज्ञा दिली.
सीतेने अग्निदिव्य करायचे ठरविले.
पृथ्वीने सीतेला आपल्यात सामावून घेतले.

उर्मिला आपल्या महालात बसलेली होती.
रामाच्या एकटेपणावर काय करावे बरे !
उर्मिलेने एक प्रसिद्ध चित्रकार बोलावला.
त्याच्याकडून सीतेचे देखणे चित्र काढून घेतले.
हुबेहूब प्रतिसीता दिसत होती ती.

उर्मिल चित्र घेउन रामाच्या महालात गेली.
रामाला तिने चित्रावरील पडदा दूर करायची विनंती केली.
रामाने तस्विरीचे अनावरण केले.
आणि क्षणार्धात राम आपल्यातच हरवले.

काही वेळ जाऊ दिल्यावर उर्मिलेने रामाला विचारले,
" चित्र कसे आहे. "
राम म्हणाले, " सीता दिसल्याबरोबर मी तिच्या आठवणीत हरवून गेलो.
चित्रातली सीता मला दिसलीच नाही. "