Tuesday, November 25, 2014

छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी.

आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी.
शून्यातून स्वराज्य निर्माण केलेले हे असामान्य व्यक्तिमत्व.
राजा कसा असावा ? या प्रश्नाचे हे राजस उत्तर !
राजांनी केलेली काही असामान्य कामे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ !
युरोपियन सेनानींच्या विषय लंपट पार्श्वभूमीवर,
पराक्रमी असूनही प्रचंड उत्तुंग चारित्र्याचा महामेरू.
शत्रूला आपल्या कक्षेत आणून पराभव करणारा,
जगातील पहिल्या क्रमांकाच्या  प्रतापगड युद्धाचा सरसेनापती.
भारतीय समाजात चैतन्य फुलविणाऱ्या,
हिंदू सिंहासनाची पुनर्स्थापना करणारा पुरुषोत्तम.
मुघलांच्या जिहादी अधर्म युद्धाविरुद्ध,
गनिमी कावा या नवयुद्ध शास्त्राचा  जनक.
तलवारीचे पाते अर्धा हात लांब करून,
शत्रूची साडेतीन हात कबर खणणारा नवशस्त्र शिल्पी.
युरोपियनांच्या पांढऱ्या पायांना पळविण्यासाठी,
बलाढ्य सागरी आरमाराची निर्मिती करणारा भविष्यवेधी.
स्वदेशी  अर्थनीती बलवान करण्यासाठी,
होन हि स्वतः ची नाणी तयार करणारा अर्थनीतीद्न्य.
दणकट किल्ल्यांची उभारणी करतांना,
सह्याद्रीलाच अभेद्य किल्ला बनविणारा अभियन्तोत्तम.
संस्कृतोद्भव भाषांच्या संवर्धनासाठी,
राज्य व्यवहार कोशाची रचना करणारा संस्कृती संवर्धक.
डोक्यावरून मैला नेणे बंद करण्यासाठी,
पहिल्यांदा किल्ल्यांवर संडास बांधणारा  समाजसुधारक.
धर्मांधांनी मुद्दाम  मोडलेली देवळे,
पुन्हा त्याच ठिकाणी उभारणारा समाज उद्धारक.
प्रतापरावाचे परावर्तन करून,
त्यास जावई करून घेणारा  धर्मरक्षक.
इतिहासालाही अज्ञात असलेले,
हेरखाते बाळगणारा चलाख राजेंद्र.

राजांच्या मृत्युनंतर पाच लाखांची क्रूर सेना घेऊन, सगळे अनुकूल  असलेला धर्मांध
औरंगजेब लढाईसाठी दक्षिणेत उतरला. राजाच  नसलेल्या दीड लाख मराठी सेनेने
प्रतिकूल परिस्थितीत, हा लढा पंचवीस वर्षे चालविला. औरंगजेबाला दक्षिणेतच
गाडला. संगठनशीलतेचे हे परमोच्च उदाहरण आहे.
राजाधीराजांना परम आदराने वंदन करताना मनात येते !

तव शौर्याचा  जरा अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे
तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे |
त्या दिप्तीतून दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पानिपत 
पुन्हा लिहाया अमुचे भारत, व्यास वाल्मिकी येतील धावत || 

Monday, January 20, 2014

१. दादरा व नगर हवेली सशस्त्र मुक्तीसंग्राम.

            १. दादरा व नगर हवेली सशस्त्र मुक्तीसंग्राम.


     रोमांच ! होय अक्षरशः काटाच उभा राहिला अंगावर ! आणि का नाही उभा राहणार ? प्रत्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते . आणि आम्ही ऐकत होतो . याची देही याची डोळा अनुभवलेला अद्बूत प्रसंग . अविस्मरणीय क्षण . भारतीय स्वातंत्र्योत्तर लढ्याचे एक लखलखते तेजस्वी पान .
     आझाद हिंद सेनेने स्वातंत्र्य युद्धाचे एक सोनेरी पान लिहिले होते . आपण कोहीमाला गेलो  तर तेथे तो स्तंभ आपल्याला दिसत असतो  . त्यावरील ओळी दिसत असतात . आपण वाचत जातो . त्या काळात प्रवेश करीत जातो . आणि आपला पुरुषार्थ  लख्खपणे समोर उभा रहातो.
When you go home,
Tell them of us and say.
For your tomorrow,
We gave our today.
     दोन ऑगस्ट ची पहाट .  झुंजूमुंजू झालेले न झालेले ! वापिचे रेल्वे स्टेशन . सुनसान, कोणीही नसलेले . डोळ्यात बोट घातले तरी काळोखालाही न दिसणारा अंधार ! आणि ढगाचे जणू दोन तुकडे झाल्याप्रमाणे धो धो कोसळणारा पाऊस ! सोबतीला विजांचे रौद्र संगीत ! भीषण ! भयप्रद !
     लहानशी शिट्टी जाणवेल न जाणवेल अशी . धुराचा लोट पावसात मिसळत रेल्वे आली . थांबली . खाणाखुणा झाल्या आणि  काहीजण दबत दबत रेल्वेत मिसळले . आपापली शस्त्रे सांभाळत . कोसळणाऱ्या पावसालाही कळू न देता .
      १९५४ भारत स्वतंत्र होऊन सात वर्षे झालेली . ब्रिटीश निघून गेलेले .  पाठोपाठ फ्रेन्चांनीही गाशा गुंडाळलेला . पण पोर्तुगिज गोचीडा सारखे डसलेले . भारतमातेचे रक्त शोषण्यात धन्यता मानलेले . हे गोचीड उपटायचे . मुळासकट फेकून द्यायचे . ४९१ स्क्वेअर  मिटरांचा हा भारतीय प्रदेश मुक्त करायचा . आणि म्हणूनच हा दादरा व नगर हवेली लढा . आझाद गोमंतक दल आणि देशभक्त भारतीय यांचा सशस्त्र मुक्तीसंग्राम.
     लवेच्या गावी हेमवंतीबाई नाटेकर यांच्या वडिलांचा आश्रम होता . नाना काजरेकर व राजा वाकणकर तिथे गेले . त्यानी गुप्तपणे माहिती काढायला सुरुवात केली . २ माशिनगन्स, ६ स्टेनगन्स, २०० रायफल्स व सोबतीला भरपूर दारुगोळा असलेले सिंहवास, सेल्वासा ठाणे . विरुद्ध गावठी शस्त्रे घेतलेली पण प्रखर देशभक्तीने भरलेली १०७ मने . मनात एकच संकल्प . सावरकरांच्या शब्दांचा ' हे काय बंधू असतो जरी सात आम्ही । त्वस्थडीलीच दिधले असते बळी मी । ' विजय कोणाचा ?  शस्त्रांचा की देशभक्तीचा ?

     सैनिकांच्या ३ तुकड्या केल्या . ठाण्याच्या तीनही बाजूनी त्या पांगल्या . आमची आक्रमणाची वेळ जवळ येत चालली . मन फडफडू  झाले . हृदय धडधडू लागले . छातीचे ठोके कानामध्ये शिरू लागले . इशारा झाला आणि आम्ही पुढे सरकू लागलो . बाबाराव भिडे यांनी गणेश चतुर्थीचे एटोम बोंम दिले होते . पंचवीस पंचवीस पावलांवर ते लावायचे होते . बॉमची वात सारखी केली  . काडीपेटी काढली तर पाण्याने ओलीचिंब भिजलेली .
     करायचे काय ? दूरवर एक घर दिसत होते . त्या घराकडे गेलो . दारावर थाप मारली . एका माणसाने दार उघडले . समोर खाकी कपड्यातील बंदुक घेतलेला मी .  मला पाहताच तो पांढरा फटक.  धावायलाच  लागला . पेंट अडखळली एका दगडाला आणि घातला साष्टांग नमस्कार . तोंडावरच आपटला तो . खिशातली काडीपेटी पडली ती नेमकी माझ्यासमोर . ती घेऊन विनाविलंब तुकडीत सामील झालो .
     तीनही बाजूंना बंदुकांचे, शू S S , बोमांचे आवाज ऐकू येत होते . पोलिस ठाणे जवळ  येऊ लागले . बलिदानाच्या कल्पनेने अंग शहारून उठले . बाहु फुरफुरू लागले . वन्दे मातरम असे नुसते तोंडानेच म्हणत होतो . आज प्रत्यक्ष कृतीची वेळ होती . विवेकानंदांनी म्हटलेय ना ' उत्तीष्ठतः जागृत प्राप्य वरान्नीबोधत । '
     दीर्घ शिट्टी झाली . धाड धाड धाड ! झाडाआडून उद्या पडायला लागल्या . पोलिसांना काय करावे तेच समजेना . एक पोलिस धीर करून पुढे येऊ लागला . थांब ! नाना सोनावणे ओरडला . पोलिस थांबेना . काय झाले काही कळलेच नाही . क्षणार्धात घडले ते . नानांनी उडी घेतली ती खिडकीतून थेट त्या पोलिस स्टेशनाच्या आत . जपानी मेकची संगीन त्या शिपायाच्या छातीतून आरपार करत .
    रडत ओरडत सगळे शिपाई शरण मागत होते . बंदुका डोक्यावर घेऊन गुढग्यावरुन रांगत होते . प्राणाची भिक मागत होते . आम्ही त्यांना पकडले . दोरीने बांधले . एका खोलीत नेउन कोंडले . बाहेर आलो . विजयाच्या घोषणा देऊ लागलो . भारत मातेचा जयजयकार करू लागलो . धनाजी कुरुङ्गळे याने पोर्तुगीज झेंडा खाली घेतला . प्रभाकर सिनारीने तो मातीत टाकला . आपल्या बुटाच्या पायांनी तो त्याला तुडवू लागला . त्यावर नाचू लागला . साडेचारशे वर्षांच्या गोवेकरी रागाचे, आतल्या आत धुमसणाऱ्या प्रतीशोधाचे ते प्रकटीकरण होते .
     आम्ही रांगेत उभे राहिलो . आपला भारतीय तिरंगा वर चढविला . वारा वाहत होता . ध्वज फडकत होता . तन मन धन पूर्वक आम्ही गर्जत होतो . भारतमाता की जय ! भारतमाता की जय !

मुझे तुम तोड लेना वनमाली,
उस पथ पर देना फेंक ।
मातृभूमी पर शीश चढाने,
जिस पथ जाये वीर अनेक ।। 

      
     
     




विवेकानंद - उठा राष्ट्रवीर हो !

                                                   
                                                                           उठा राष्ट्रवीर हो ! 

     स्वामी विवेकानंद हे भारतमातेला पडलेले लोभस स्वप्न . भारतीय अभुदयाच्या पूर्वसंध्येला नियतीने काळाची गरज ओळखून भारतमातेला ते दिले. अंधार पुसट होऊ लागला आणि परमेश्वराने आपली कूस बदलली . 
    विवेकानंद जन्मजात मेधावी आणि कृतीशील . नित्य नव्या शोधात असलेले प्रतिभावान व्यक्तिमत्व . स्वामी रामकृष्ण यांच्या सहवासात ते आले. त्यांनी या हिऱ्याला पैलू पाडले . सगळ्यांच्या लक्षात आले ते शिकागो परिषदेत . विवेकानंदांचे भाषण ऐकल्यानंतर . हा होता एका झंझावाताचा शुभारंभ . 
     विवेकानंदांच्या डोळ्यांसमोर नेहमी राहिला तो तरुण, युवा, युथ ! युग बदलयचेय आपल्याला !  वेदांत म्हटले आहे ' अशिष्टो बलिष्टो दृढिष्टो मेधावी ' म्हणजेच ' दृढ बलशाली , तीव्र बुद्धीची आणि चैतन्यशाली माणसेच ईश्वराजवळ पोहोचू शकतात .' तुमचा भविष्यकाळ निश्चीत करण्याची हीच वेळ आहे. म्हणूनच मी म्हणतो,आताच या उसळत्या तारुण्यात, या नव्या उत्साहाचे वातावरणातच  कार्य करा . काम करण्याची हीच वेळ आहे .आताच आपल्या भाग्याचा निर्णय करा आणि कामाला लागा .कारण जे पुष्प अजून चुरगळलेले नाही, जे ताजे आहे, जे अद्याप हुगले गेलेले नाही तेच ईश्वरचरणी अर्पण केले जाते .ईश्वर त्याचाच भुकेला असतो .
     भूतकाळातून भविष्याचे निर्माण होते .म्हणून जितके मागे पाहता येईल तितके मागे पहा .तुमच्या मागे जो अनंत जीवनप्रवाह आहे त्याचे यथेच्च  प्राशन करा , आणि पुढे पहा .पुढे चला आणि भारताला पहिल्यापेक्षा अधिक उन्नत करा . आपले पूर्वज महान होते याचे प्रथम स्मरण करा . आम्ही प्रथम त्या तत्वांना समजले पाहिजे ज्यामुळे आम्ही बनलो आहोत . त्या रक्ताला समजले पाहिजे कि जे आमच्या नसानसातून वाहत आहे .आम्हाला त्या रक्तावर व त्या रक्ताने भूतकाळात जे केले त्यावर विश्वास ठेवला पाहिजे . भूतकाळातील ती श्रेष्ठता व चेतना , त्यासंबंधी आमची आस्था या भरवशावर आम्हाला पहिल्यापेक्षा अधिक भव्य व अधिक दिव्य भारत निर्माण करायचा आहे .
   स्वामीजींना शंभर युवक हवे होते ! शंभर टक्क्यांना बदलणारे ! ' काही थोड्या लोकांनी तरी उठून उभे राहावे आणि म्हणावे की, परमेश्वराखेरीज आम्हाला अन्य ईप्सित नाही. जगासाठी धर्मजागरण करणे हेच आमचे जीवितकार्य. असा त्याग तुम्ही करू शकत असला, तर दृढपणे उभे रहा. हे धर्मयुद्ध आहे. यात शंभर योद्धे जरी कोसळले तर त्यांच्या हातीची ध्वजा घ्या आणि ती पुढे न्या. जो पडतो त्याने आपल्या हातीची ध्वजा दुसऱ्याच्या हाती द्यावी. ती काही कधी खाली येणार नाही. कोणीही पडले तरी ईश्वरी सत्ता अढळ राहणार आहे. '
      चरित्र्यसंपन्न, बुद्धीसंपन्न आणि लोकसेवेसाठी सर्वस्व समर्पण करणारे युवक हवेत. माझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्राणही ओवाळून टाकण्याची सिद्धता असलेल्या आणि त्याद्वारे स्वतःचे आणि संपूर्ण देशाचे कल्याण करू शकणाऱ्या आज्ञांकित युवकांवरच माझ्या भविष्यातील आशा केंद्रित झाल्या आहेत. सर्वसामान्य मुले माझ्याकडे येतच असतात. त्यांच्या मुद्रांवर तेज नसते, त्यांच्या हृदयात उत्साहाचा अभाव असतो, त्यांची शरीरे दुर्बळ, कुचकामी असतात आणि मनात धैर्याचा लेशही नसतो. अशांकडून काय काम होणार? नचिकेताची श्रद्धा असलेले बारा युवक मला मिळाले तर या देशातील विचारांना आणि कार्याला मी नवी दिशा देऊ शकेन.
     विवेकानंद म्हणाले, ' आपल्या भविष्याचे शिल्पकार आपणच व्हा . भूतकाळात जे होऊन गेले त्याचे स्मरणही ठेऊ नका . असीम भविष्यकाळ आपल्यापुढे आहे . लक्षात ठेवा , तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द , केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते . दुष्ट विचार आणि दुष्ट कृती या तुमच्यावर झडप घालायला वाघासारख्या टपलेल्या असतात . तसेच शुभविचार , शुभकृत्ये यांच्या अनंत शक्तीही तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, साहाय्य करण्यासाठी सदैव सिद्ध असतात . 
     सुशिक्षित तरुणांमध्ये कार्य करा, त्यांना एकत्र आणा, त्यांची संघटना करा. श्रेष्ठ त्यागातूनच श्रेष्ठ कार्य उभे राहते.माझ्या शूर, गुणी, मुलांनो ! आपल्या योजनांवर काम करण्यासाठी स्वतःची सर्व शक्ती वेचा ! एखादा चित्रकार चित्र रंगविताना इतका तन्मय होतो की, त्याला स्वतःचे सुद्धा भान राहात नाही . असा चित्रकारच श्रेष्ठ कलाकृतींना जन्म देऊ शकतो . ईश्वराशी जो योगबळाने एकरूप झाला तो आपले सर्व काम अत्यंत एकाग्रतेने करतो आणि व्यक्तिगत लाभाची काहीच अपेक्षा करीत नाही, अशा कर्मातून जगाचे नेहमी भलेच होत असते . वाईट काही होणे शक्यच नाही . गीता म्हणते की, आपली सर्वच कर्मे अशा रीतीने ' स्व ' ला विसरून झाली पाहिजेत . 
     नाव,कीर्ती,किंवा असल्या क्षुद्र गोष्टींच्या मागे लागू नका. झोकून देऊन काम करा. लक्षात ठेवा, ' सुके गवत जेव्हा दोरखंडात गुंतले जाते तेव्हा त्यामध्ये पिसाट हत्तीलासुद्धा बांधून ठेवण्याचे सामर्थ्य येते.   कोणत्याही एका ध्येयाचा ध्यास घ्या . त्यासाठी जीवन अर्पण करा . ते ध्येय इतके मोठे असावे, इतके उत्कट असावे, त्यापुढे अन्य सर्व गोष्टी विरघळून जाव्यात . त्याशिवाय इतर कशाला जीवनात जागाच राहू नये . वेळच राहू नये . 
    तुम्ही दिव्यत्वाचे अंश आहात . त्यामुळे श्रेष्ठतम गोष्टी तुमच्या चरणांशीच  आहेत . तुमचे स्वरूप इतके शक्तिमान आहे की, आकाशांतल्या सर्व तारकांचे तेज ओंजळीत घेऊन तुम्ही पिउन टाकाल . शक्तिमान व्हा ! सर्व अंधश्रद्धा दूर करा आणि मुक्त व्हा ! 
     गरीब , अज्ञानी आणि दलित यांच्या बद्दल सहानुभूतीचा आणि त्यांच्या उन्नतीसाठी सतत कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा वारसा मी तुम्हाला देत आहे . जे गरीब आहेत , जे दलित आहेत ,जे खालच्या जातीचे समजले जातात त्यांच्यासाठी कष्ट  करा . बलिदान करा .आपल्या संपूर्ण जीवनाचे बलिदान करा .बंधुनो ! आपण सर्वजण सतत कार्य करू या ! हि झोप घेण्याची वेळ नाही . भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे . भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे . उठा ! जागे व्हा आणि आपल्या ह्या भारतमातेला तिच्या त्या शाश्वत सिंहासनावर पुनः विराजमान झालेली पहा .
      तिच्यात नवचैतन्याचा संचार होऊ द्या . आणि पूर्वी कधीही तिला लाभले नसेल अशा अपूर्व तेजाने ती परत तळपू द्या .
 हे वीर आत्म्यांनो, ज्यांना बेड्यांनी जखडून टाकले आहे, त्यांना मुक्त करण्यासाठी, जे दुःखाच्या भाराने लादले गेले आहेत त्यांचे ओझे कमी करण्यासाठी आणि जे अज्ञानाच्या घनघोर अंधारात बुडून गेले आहेत अशांची हृदये प्रकाशित करण्यासाठी पुढे चला ! ऐका ! वेदांत डंका पिटून घोषणा करीत आहे ' अभिः ' निर्भय बना . ईश्वराची हि पवित्र वाणी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्या हृदयाची तर छेडण्यास समर्थ होईल .
       स्वामी विवेकानंदांच्या समोरचे ध्येय स्पष्ट होते . ते स्वतः पाहताना, त्याचा परिसस्पर्श तरुणांना देताना ते म्हणतात, '  मी भविष्यात डोकावून पहात नाही.तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात उभे राहते. हि प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवासह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. शान्तिमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करूया ! '