Sunday, April 26, 2020

कल्याण आश्रम - स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह !

               स्वामी विवेकानंद सार्ध शती  समारोह ! 

     ' मी भविष्यात डोकावण्याचा खटाटोप करत नाही . त्याची मला जरूरच वाटत नाही .  मात्र एक उज्वल दृश्य मला स्पष्टपणे दिसत आहे . ती चिरपुरातन मातृदेवता पुनरपि जागी झाली आहे . आपल्या श्रेष्ठ सिंहासनावर ती आरूढ झाली आहे आणि सर्वगौरवाने तळपत आहे . '
     हे उद्गार आहेत स्वामी विवेकानंदांचे . भारतमातेला जगाच्या सिंहासनावर पुनः आरूढ करण्यासाठी कृत संकल्प झालेल्या महापुरुषाचे . स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ या दिवशी पौष कृष्ण सप्तमी शके १७८५ ला कोलकाता येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरीदेवी असे होते . सर्वजण त्याला ' बिले ' असे म्हणत .लहानपणी बिले खूपच खोडकर होता . दंगामस्ती करायला, कोणतेही कठीण काम करायला तो नेहमीच पुढे असे . वडीलधारया माणसाना तर तो नेहमी विविध प्रश्न विचारून भंडावून सोडे . हि मस्ती नव्हती, ती होती त्यांच्या भावी कार्याची बीजे .
     आपले शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी समाजाची सेवा करण्याचा निश्चय केला . त्याकाळी दक्षिणेश्वरी असलेल्या कालीमातेच्या मंदिरात स्वामी रामकृष्ण पूजा करीत असत . त्यांना परमेश्वरी साक्षात्कार झाला होता . बिलेने त्यांची भेट घेतली आणि जिवाशिवाची जोडी जुळली . विवेकानंद भारतभ्रमण करायला बाहेर पडले . ' करतल भिक्षा तरुतल वास ' करीत करीत ते कन्याकुमारीला आले . भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या दगडावर, श्रीपाद शिलेवर ते ध्यानस्थ बसले . गरिबी, अज्ञान, अशिक्षा यांनी पीडित झालेल्या भारताचे दर्शन घडले त्यांना . त्यांनी निश्चय केला माझे संपूर्ण जीवन मी भारतमातेच्या सेवेला वाहीन .
     अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्मपरिषद भरली होती . स्वामी विवेकानंदांचे तेथे झालेले छोटेसे भाषण त्यांना जागतिक कीर्ती देऊन गेले . तत्कालीन युरोपीय जगताचे ते आध्यात्मिक ब्रेंड एंबेसेडर बनले . उच्चभ्रू लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचू लागले . युरोपियन समुदायाच्या मोहमयी विश्वात राहूनसुद्धा स्वामीजींचे लक्ष होते भारताकडे . भारताच्या पुनरुत्थानाकडे !
     स्वामीजी भारतात परतले . भारताच्या जागृतीचे काम त्यांनी सुरु केले . तरुणांना आवाहन करताना ते म्हणतात, '  जे सुकुमार आहे; शक्तीपूर्ण, आरोग्यपूर्ण आणि कुशाग्र बुद्धियुक्त आहे तेच परमेश्वराजवळ जाते असे वेदवचन आहे . म्हणून उठा ! स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा क्षण हाच आहे . जोपर्यंत तुम्हामध्ये तारुण्याची तडफ आहे, जोवर तुम्ही थकले-भागलेले, फिकटलेले, गळालेले असे झालेला नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीने मुसमुसलेले आहात तोपर्यंत निश्चय करा ! उठा, काम करा !नुकतेच उमललेले, न हाताळलेले, वास न घेतलेले पुष्पच ईश्वराच्या चरणी अर्पण करायचे असते ! हीच ती शुभ घडी आहे . '
     दुसऱ्याला केवळ दोष देणे किवा रडत बसणे विवेकानंदांना मान्य नव्हते . '  एखाद्या खोलीत शतकानुशतके अंधार आहे . तिथे आपण गेलो आणि रडत बसलो, ' किती बरे अंधार हा, किती बरे अंधार हा ! ' असे रडल्याने अंधार जाईल का ? प्रकाश आणा नि तत्क्षणी अंधार नाहीसा होईल ! हेच तत्व मनुष्य-सुधारणेमागे आहे . या देशाचे आध्यात्मिक पुनरुत्थान करण्याचा हाच मार्ग आहे . परस्परांशी भांडण करणे वा लोक जे करीत आहेत त्यावर टीकास्त्र सोडणे यातून काहीच साधणार नाही . त्यांच्यापुढे चांगले तेवढे ठेवा . पहा किती उत्सुकतेने ते त्याचा स्वीकार करतील ! सर्व वंश जागृत होऊन उभा राहील आणि बाहु उभारून जे श्रेष्ठ आहे - तेजस्वी आहे त्याचा स्वीकार करील ! '  
      भारताचा विकास म्हणजे भारतातील सामान्य माणसाचा विकास यावर स्वामीजींचा विश्वास होता . त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. धर्म, शिक्षण, आरोग्य, सेवा यांचा प्रसार केला . ते म्हणाले , '   हे राष्ट्र उभे राहाणार ते कोणातून ? भंगी आणि चांभार यांच्यातून ! कोळ्यांच्या झोपड्यांतून नि शेतकऱ्यांच्या खोपट्यातून ! या नव्या भारताचे चैतन्य उसळणार आहे कुंभाराच्या भट्टीतून आणि वाण्याच्या दुकानातून ! याचे स्फुरण आहे कारखाने आणि बाजारपेठातून ! वनांतून आणि वनरायामधून . डोंगरदऱ्यामधून !
     यंदा स्वामी विवेकानंदांच्या जन्माला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत . आज  जग मोठ्या संभ्रमित अवस्थेत आहे . युरोपीय प्रगतीचा फुगा फुटण्याच्या अवस्थेत आहे . जगाला त्याने विनाशाच्या उंबरठ्यावर आणले आहे . अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्य संपूर्ण सामाजिक पारतंत्र्याला कारणीभूत होत आहे .  आणि अशा परिवर्तन बिंदूवर स्वामीजींची सार्धशती आली आहे . स्वाभाविक जग आज भारताकडे मोठ्या आशेने पहात आहे .
     भारत आज सर्वाधिक तरुण युवा असलेला देश आहे . हे युवा आपला देश, इतिहास, संस्कृती जाणून घेऊ इच्छिणारे ! भारताविशी गंभीर असणारे ! सेवेचा संदेश ज्यांना आकर्षित करतो असे ! स्वामीजींनी म्हटले होते, '  पावित्र्याच्या तेजाने तळपणारे , ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेले , मृगेन्द्राचे सामर्थ्य नसात स्फुरत असलेले , दीनदलितांबद्धल हृदयात अपार करुन असलेले सहस्रो युवक-युवती हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र संचार करतील; मुक्ती, सेवा आणि सामाजिक उत्थानाचे आणि सर्व प्रकारच्या समानतेचे आवाहन ते करतील आणि हा देश पौरुषाने मुसमुसून उठेल ! ' 
     सार्धशतीच्या निमित्ताने आपण जगाला एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहोत . जेथे मतभेद आहेत तेथे कार्याबद्धल अनुकुलता निर्माण करणे . जेथे अनुकुलता आहे तेथे शक्ती संपादन करणे . जेथे कार्यशक्ती आहे तेथे ती अधिक प्रभावी करणे . ज्या क्षेत्रात अजून प्रवेश झालेला नाही तेथे कार्याचा विस्तार करणे . असा हेतू ठेऊन काम करतो आहोत . युवा, महिला, प्रबुद्ध वर्ग, ग्रामवासी व जनजाती अशा विविध आयामांनी समाजाच्या सर्व थरांपर्यंत जात आहोत . स्वामीजी प्रमाणेच धर्म व देशविषयक श्रद्धेला जागवित आहोत . 
     आपल्या देशात वनांचलात काम करणाऱ्या संस्था आहेत . समाजाच्या पुनरूत्थानाचे काम अत्यंत प्रभावीरीत्या करण्याचे कार्य त्या करीत आहेत .  त्यांना अधिक सक्रिय करणे, या कार्यातील त्यांचा सहभाग वाढविणे आपण करणार आहोत .अळब्यासारख्या संस्था काढून समाजविघातक उपद्व्याप करणाऱ्यांना साहजिकच चाप बसणार आहे . समाज कार्यात जनजाती प्रमुखांचा सहभाग वाढविणे,  त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करणे यासाठी विचारविनिमय-परिसंवादात्मक कार्यक्रमांची आखणी आपण करणार आहोत .  
      शिक्षण हा समाजाचा पाया . तो बलवान व्हायलाच हवा . यासाठी यावर्षी शिक्षण संस्थांचे कार्य आपण गतिमान करतो आहोत . त्याची व्याप्ती वाढविणे, वसतिगृहात विवेकानंदांच्या प्रतिमेचे अनावरण करणे, त्यांच्या विचारांचे व्याख्यान ठेवणे, वसतिगृहाची संख्या वाढविणे . ती अधिक कार्यक्षम करणे असे उद्देश्य ठरवून आपण काम करणार आहोत . 
    स्वास्थ्यविषयक विचार करताना चिकित्सा शिबिरांचे आयोजन करणे . तालुका स्तरावर कबड्डी , खोखो आदि खेळांच्या स्पर्धा घडविणे . महिलांसाठी समूह नृत्याचे आयोजन करणे . अशा विविध अंगांनी काम करण्याचा प्रयत्न या वर्षी आपण करीत आहोत . स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलेय, ' उत्साहाने हृदय भरून घ्या आणि सव ठिकाणी व्यापून जा. नेतृत्व करताना सर्वांचे दास व्हा, निःस्वार्थी व्हा आणि कधी एखाद्या मित्राला दुसऱ्याची त्याच्या पाठीमागे निंदा करताना ऐकू नका . '
    



Saturday, April 25, 2020

वन्दे मातरम - एक धगधगते इतिहासपर्व

         वन्दे मातरम - एक धगधगते इतिहासपर्व 

     होय ! बरोब्बर शंभर वर्षे झाली आज त्या घटनेला ! लायलपूर जिल्ह्यातील बंगा गांव . सरदार किशनसिंह आपल्या मुलाला बेटा भगतला घेऊन आमराईत आले होते . कामगार काम करत होते . आमराई तयार करण्याचे काम चालले होते . छोट्या भगतला एका झाडाखाली खेळायला सोडून ते कामाची पाहणी करत ते फिरू लागले .  काही वेळाने त्याचे लक्ष भगतकडे गेले . भगत जमिनीमध्ये छोटे छोटे खड्डे करून आंब्याची पाने जमिनीत पुरत होता .  कुतूहलाने किशनसिंहनी भगतला विचारले, " क्या कर रहे हो भगत ? " ओठ पिळले तर अजूनही दुध निघेल असा तो आठ वर्षांचा बालक बोलता झाला, " पिताजी, बंदुके बो रहा हूं । " 
     वन्दे मातरम ! भारताचे राष्ट्रगीत !  भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील  धगधगती मशाल ! लक्षावधी तरुणांना स्वातंत्र्य यज्ञाच्या बलीवेदीची  
                            नको स्थान मज बहुमानाचे 
                                 कंठावरचे, शीर्षावरचे 
                           कनकमण्यांचे, चकाकण्यांचे 
                             तुझ्या पदींचा घुंगुरवाळा 
                               राष्ट्रदेवी मज कर ना ।
     
     

रोमांच ! होय अक्षरशः काटाच उभा राहिला अंगावर ! आणि का नाही उभा राहणार ? प्रत्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते . आणि आम्ही ऐकत होतो . याची देही याची डोळा अनुभवलेला अद्बूत प्रसंग . अविस्मरणीय क्षण . भारतीय स्वातंत्र्योत्तर लढ्याचे एक लखलखते तेजस्वी पान .
     आझाद हिंद सेनेने स्वातंत्र्य युद्धाचे एक सोनेरी पान लिहिले होते . आपण कोहीमाला गेलो  तर तेथे तो स्तंभ आपल्याला दिसत असतो  . त्यावरील ओळी दिसत असतात . आपण वाचत जातो . त्या काळात प्रवेश करीत जातो . आणि आपला पुरुषार्थ  लख्खपणे समोर उभा रहातो.
When you go home,
Tell them of us and say.
For your tomorrow,
We gave our today.
     दोन ऑगस्ट ची पहाट .  झुंजूमुंजू झालेले न झालेले ! वापिचे रेल्वे स्टेशन . सुनसान, कोणीही नसलेले . डोळ्यात बोट घातले तरी काळोखालाही न दिसणारा अंधार ! आणि ढगाचे जणू दोन तुकडे झाल्याप्रमाणे धो धो कोसळणारा पाऊस ! सोबतीला विजांचे रौद्र संगीत ! भीषण ! भयप्रद !
     लहानशी शिट्टी जाणवेल न जाणवेल अशी . धुराचा लोट पावसात मिसळत रेल्वे आली . थांबली . खाणाखुणा झाल्या आणि  काहीजण दबत दबत रेल्वेत मिसळले . आपापली शस्त्रे सांभाळत . कोसळणाऱ्या पावसालाही कळू न देता .
      १९५४ भारत स्वतंत्र होऊन सात वर्षे झालेली . ब्रिटीश निघून गेलेले .  पाठोपाठ फ्रेन्चांनीही गाशा गुंडाळलेला . पण पोर्तुगिज गोचीडा सारखे डसलेले . भारतमातेचे रक्त शोषण्यात धन्यता मानलेले . हे गोचीड उपटायचे . मुळासकट फेकून द्यायचे . ४९१ स्क्वेअर  मिटरांचा हा भारतीय प्रदेश मुक्त करायचा . आणि म्हणूनच हा दादरा व नगर हवेली लढा . आझाद गोमंतक दल आणि देशभक्त भारतीय यांचा सशस्त्र मुक्तीसंग्राम.
     लवेच्या गावी हेमवंतीबाई नाटेकर यांच्या वडिलांचा आश्रम होता . नाना काजरेकर व राजा वाकणकर तिथे गेले . त्यानी गुप्तपणे माहिती काढायला सुरुवात केली . २ माशिनगन्स, ६ स्टेनगन्स, २०० रायफल्स व सोबतीला भरपूर दारुगोळा असलेले सिंहवास, सेल्वासा ठाणे . विरुद्ध गावठी शस्त्रे घेतलेली पण प्रखर देशभक्तीने भरलेली १०७ मने . मनात एकच संकल्प . सावरकरांच्या शब्दांचा ' हे काय बंधू असतो जरी सात आम्ही । त्वस्थडीलीच दिधले असते बळी मी । ' विजय कोणाचा ?  शस्त्रांचा की देशभक्तीचा ?
 युद्धाचे काही संकेत असतात . पुढे नाही जाता आले तरी आहे तेथे दृढ टिकून राहायचे . मोर्चा सोडायचा नाही . आम्ही तसेच केले . आणि ' यलो पिंपळ ' वरून आम्ही चिन्यांना हुसकून लावू शकलो . आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे ठाणे आम्ही तोफखान्याची मदत न घेता जिंकले . बिरबल म्हणत असे ' शस्त्र कोणते श्रेष्ठ ? जे वेळेवर हाती मिळेल ते ! '  ' नेपोलियन नेहमी सांगे ' युद्धात शस्त्र लढत असते, पण त्यापेक्षा खरे लढते ते मन, हृदय ! ' मला कवीच्या त्या फुलाची आठवण आली  
मुझे तुम तोड लेना वनमाली,
उस पथ पर देना फेंक ।
मातृभूमी पर शीश चढाने,
जिस पथ जाये वीर अनेक ।।
   आम्ही रांगेत उभे राहिलो . आपला भारतीय तिरंगा वर चढविला . वारा वाहत होता . ध्वज फडकत होता . तन मन धन पूर्वक आम्ही गर्जत होतो . भारतमाता की जय ! भारतमाता की जय ! ! ! 

Tuesday, November 25, 2014

छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी.

आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी.
शून्यातून स्वराज्य निर्माण केलेले हे असामान्य व्यक्तिमत्व.
राजा कसा असावा ? या प्रश्नाचे हे राजस उत्तर !
राजांनी केलेली काही असामान्य कामे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ !
युरोपियन सेनानींच्या विषय लंपट पार्श्वभूमीवर,
पराक्रमी असूनही प्रचंड उत्तुंग चारित्र्याचा महामेरू.
शत्रूला आपल्या कक्षेत आणून पराभव करणारा,
जगातील पहिल्या क्रमांकाच्या  प्रतापगड युद्धाचा सरसेनापती.
भारतीय समाजात चैतन्य फुलविणाऱ्या,
हिंदू सिंहासनाची पुनर्स्थापना करणारा पुरुषोत्तम.
मुघलांच्या जिहादी अधर्म युद्धाविरुद्ध,
गनिमी कावा या नवयुद्ध शास्त्राचा  जनक.
तलवारीचे पाते अर्धा हात लांब करून,
शत्रूची साडेतीन हात कबर खणणारा नवशस्त्र शिल्पी.
युरोपियनांच्या पांढऱ्या पायांना पळविण्यासाठी,
बलाढ्य सागरी आरमाराची निर्मिती करणारा भविष्यवेधी.
स्वदेशी  अर्थनीती बलवान करण्यासाठी,
होन हि स्वतः ची नाणी तयार करणारा अर्थनीतीद्न्य.
दणकट किल्ल्यांची उभारणी करतांना,
सह्याद्रीलाच अभेद्य किल्ला बनविणारा अभियन्तोत्तम.
संस्कृतोद्भव भाषांच्या संवर्धनासाठी,
राज्य व्यवहार कोशाची रचना करणारा संस्कृती संवर्धक.
डोक्यावरून मैला नेणे बंद करण्यासाठी,
पहिल्यांदा किल्ल्यांवर संडास बांधणारा  समाजसुधारक.
धर्मांधांनी मुद्दाम  मोडलेली देवळे,
पुन्हा त्याच ठिकाणी उभारणारा समाज उद्धारक.
प्रतापरावाचे परावर्तन करून,
त्यास जावई करून घेणारा  धर्मरक्षक.
इतिहासालाही अज्ञात असलेले,
हेरखाते बाळगणारा चलाख राजेंद्र.

राजांच्या मृत्युनंतर पाच लाखांची क्रूर सेना घेऊन, सगळे अनुकूल  असलेला धर्मांध
औरंगजेब लढाईसाठी दक्षिणेत उतरला. राजाच  नसलेल्या दीड लाख मराठी सेनेने
प्रतिकूल परिस्थितीत, हा लढा पंचवीस वर्षे चालविला. औरंगजेबाला दक्षिणेतच
गाडला. संगठनशीलतेचे हे परमोच्च उदाहरण आहे.
राजाधीराजांना परम आदराने वंदन करताना मनात येते !

तव शौर्याचा  जरा अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे
तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे |
त्या दिप्तीतून दाही दिशा द्रुत, उजळून टाकू पुसू पानिपत 
पुन्हा लिहाया अमुचे भारत, व्यास वाल्मिकी येतील धावत || 

Monday, January 20, 2014

१. दादरा व नगर हवेली सशस्त्र मुक्तीसंग्राम.

            १. दादरा व नगर हवेली सशस्त्र मुक्तीसंग्राम.


     रोमांच ! होय अक्षरशः काटाच उभा राहिला अंगावर ! आणि का नाही उभा राहणार ? प्रत्यक्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते . आणि आम्ही ऐकत होतो . याची देही याची डोळा अनुभवलेला अद्बूत प्रसंग . अविस्मरणीय क्षण . भारतीय स्वातंत्र्योत्तर लढ्याचे एक लखलखते तेजस्वी पान .
     आझाद हिंद सेनेने स्वातंत्र्य युद्धाचे एक सोनेरी पान लिहिले होते . आपण कोहीमाला गेलो  तर तेथे तो स्तंभ आपल्याला दिसत असतो  . त्यावरील ओळी दिसत असतात . आपण वाचत जातो . त्या काळात प्रवेश करीत जातो . आणि आपला पुरुषार्थ  लख्खपणे समोर उभा रहातो.
When you go home,
Tell them of us and say.
For your tomorrow,
We gave our today.
     दोन ऑगस्ट ची पहाट .  झुंजूमुंजू झालेले न झालेले ! वापिचे रेल्वे स्टेशन . सुनसान, कोणीही नसलेले . डोळ्यात बोट घातले तरी काळोखालाही न दिसणारा अंधार ! आणि ढगाचे जणू दोन तुकडे झाल्याप्रमाणे धो धो कोसळणारा पाऊस ! सोबतीला विजांचे रौद्र संगीत ! भीषण ! भयप्रद !
     लहानशी शिट्टी जाणवेल न जाणवेल अशी . धुराचा लोट पावसात मिसळत रेल्वे आली . थांबली . खाणाखुणा झाल्या आणि  काहीजण दबत दबत रेल्वेत मिसळले . आपापली शस्त्रे सांभाळत . कोसळणाऱ्या पावसालाही कळू न देता .
      १९५४ भारत स्वतंत्र होऊन सात वर्षे झालेली . ब्रिटीश निघून गेलेले .  पाठोपाठ फ्रेन्चांनीही गाशा गुंडाळलेला . पण पोर्तुगिज गोचीडा सारखे डसलेले . भारतमातेचे रक्त शोषण्यात धन्यता मानलेले . हे गोचीड उपटायचे . मुळासकट फेकून द्यायचे . ४९१ स्क्वेअर  मिटरांचा हा भारतीय प्रदेश मुक्त करायचा . आणि म्हणूनच हा दादरा व नगर हवेली लढा . आझाद गोमंतक दल आणि देशभक्त भारतीय यांचा सशस्त्र मुक्तीसंग्राम.
     लवेच्या गावी हेमवंतीबाई नाटेकर यांच्या वडिलांचा आश्रम होता . नाना काजरेकर व राजा वाकणकर तिथे गेले . त्यानी गुप्तपणे माहिती काढायला सुरुवात केली . २ माशिनगन्स, ६ स्टेनगन्स, २०० रायफल्स व सोबतीला भरपूर दारुगोळा असलेले सिंहवास, सेल्वासा ठाणे . विरुद्ध गावठी शस्त्रे घेतलेली पण प्रखर देशभक्तीने भरलेली १०७ मने . मनात एकच संकल्प . सावरकरांच्या शब्दांचा ' हे काय बंधू असतो जरी सात आम्ही । त्वस्थडीलीच दिधले असते बळी मी । ' विजय कोणाचा ?  शस्त्रांचा की देशभक्तीचा ?

     सैनिकांच्या ३ तुकड्या केल्या . ठाण्याच्या तीनही बाजूनी त्या पांगल्या . आमची आक्रमणाची वेळ जवळ येत चालली . मन फडफडू  झाले . हृदय धडधडू लागले . छातीचे ठोके कानामध्ये शिरू लागले . इशारा झाला आणि आम्ही पुढे सरकू लागलो . बाबाराव भिडे यांनी गणेश चतुर्थीचे एटोम बोंम दिले होते . पंचवीस पंचवीस पावलांवर ते लावायचे होते . बॉमची वात सारखी केली  . काडीपेटी काढली तर पाण्याने ओलीचिंब भिजलेली .
     करायचे काय ? दूरवर एक घर दिसत होते . त्या घराकडे गेलो . दारावर थाप मारली . एका माणसाने दार उघडले . समोर खाकी कपड्यातील बंदुक घेतलेला मी .  मला पाहताच तो पांढरा फटक.  धावायलाच  लागला . पेंट अडखळली एका दगडाला आणि घातला साष्टांग नमस्कार . तोंडावरच आपटला तो . खिशातली काडीपेटी पडली ती नेमकी माझ्यासमोर . ती घेऊन विनाविलंब तुकडीत सामील झालो .
     तीनही बाजूंना बंदुकांचे, शू S S , बोमांचे आवाज ऐकू येत होते . पोलिस ठाणे जवळ  येऊ लागले . बलिदानाच्या कल्पनेने अंग शहारून उठले . बाहु फुरफुरू लागले . वन्दे मातरम असे नुसते तोंडानेच म्हणत होतो . आज प्रत्यक्ष कृतीची वेळ होती . विवेकानंदांनी म्हटलेय ना ' उत्तीष्ठतः जागृत प्राप्य वरान्नीबोधत । '
     दीर्घ शिट्टी झाली . धाड धाड धाड ! झाडाआडून उद्या पडायला लागल्या . पोलिसांना काय करावे तेच समजेना . एक पोलिस धीर करून पुढे येऊ लागला . थांब ! नाना सोनावणे ओरडला . पोलिस थांबेना . काय झाले काही कळलेच नाही . क्षणार्धात घडले ते . नानांनी उडी घेतली ती खिडकीतून थेट त्या पोलिस स्टेशनाच्या आत . जपानी मेकची संगीन त्या शिपायाच्या छातीतून आरपार करत .
    रडत ओरडत सगळे शिपाई शरण मागत होते . बंदुका डोक्यावर घेऊन गुढग्यावरुन रांगत होते . प्राणाची भिक मागत होते . आम्ही त्यांना पकडले . दोरीने बांधले . एका खोलीत नेउन कोंडले . बाहेर आलो . विजयाच्या घोषणा देऊ लागलो . भारत मातेचा जयजयकार करू लागलो . धनाजी कुरुङ्गळे याने पोर्तुगीज झेंडा खाली घेतला . प्रभाकर सिनारीने तो मातीत टाकला . आपल्या बुटाच्या पायांनी तो त्याला तुडवू लागला . त्यावर नाचू लागला . साडेचारशे वर्षांच्या गोवेकरी रागाचे, आतल्या आत धुमसणाऱ्या प्रतीशोधाचे ते प्रकटीकरण होते .
     आम्ही रांगेत उभे राहिलो . आपला भारतीय तिरंगा वर चढविला . वारा वाहत होता . ध्वज फडकत होता . तन मन धन पूर्वक आम्ही गर्जत होतो . भारतमाता की जय ! भारतमाता की जय !

मुझे तुम तोड लेना वनमाली,
उस पथ पर देना फेंक ।
मातृभूमी पर शीश चढाने,
जिस पथ जाये वीर अनेक ।। 

      
     
     




विवेकानंद - उठा राष्ट्रवीर हो !

                                                   
                                                                           उठा राष्ट्रवीर हो ! 

     स्वामी विवेकानंद हे भारतमातेला पडलेले लोभस स्वप्न . भारतीय अभुदयाच्या पूर्वसंध्येला नियतीने काळाची गरज ओळखून भारतमातेला ते दिले. अंधार पुसट होऊ लागला आणि परमेश्वराने आपली कूस बदलली . 
    विवेकानंद जन्मजात मेधावी आणि कृतीशील . नित्य नव्या शोधात असलेले प्रतिभावान व्यक्तिमत्व . स्वामी रामकृष्ण यांच्या सहवासात ते आले. त्यांनी या हिऱ्याला पैलू पाडले . सगळ्यांच्या लक्षात आले ते शिकागो परिषदेत . विवेकानंदांचे भाषण ऐकल्यानंतर . हा होता एका झंझावाताचा शुभारंभ . 
     विवेकानंदांच्या डोळ्यांसमोर नेहमी राहिला तो तरुण, युवा, युथ ! युग बदलयचेय आपल्याला !  वेदांत म्हटले आहे ' अशिष्टो बलिष्टो दृढिष्टो मेधावी ' म्हणजेच ' दृढ बलशाली , तीव्र बुद्धीची आणि चैतन्यशाली माणसेच ईश्वराजवळ पोहोचू शकतात .' तुमचा भविष्यकाळ निश्चीत करण्याची हीच वेळ आहे. म्हणूनच मी म्हणतो,आताच या उसळत्या तारुण्यात, या नव्या उत्साहाचे वातावरणातच  कार्य करा . काम करण्याची हीच वेळ आहे .आताच आपल्या भाग्याचा निर्णय करा आणि कामाला लागा .कारण जे पुष्प अजून चुरगळलेले नाही, जे ताजे आहे, जे अद्याप हुगले गेलेले नाही तेच ईश्वरचरणी अर्पण केले जाते .ईश्वर त्याचाच भुकेला असतो .
     भूतकाळातून भविष्याचे निर्माण होते .म्हणून जितके मागे पाहता येईल तितके मागे पहा .तुमच्या मागे जो अनंत जीवनप्रवाह आहे त्याचे यथेच्च  प्राशन करा , आणि पुढे पहा .पुढे चला आणि भारताला पहिल्यापेक्षा अधिक उन्नत करा . आपले पूर्वज महान होते याचे प्रथम स्मरण करा . आम्ही प्रथम त्या तत्वांना समजले पाहिजे ज्यामुळे आम्ही बनलो आहोत . त्या रक्ताला समजले पाहिजे कि जे आमच्या नसानसातून वाहत आहे .आम्हाला त्या रक्तावर व त्या रक्ताने भूतकाळात जे केले त्यावर विश्वास ठेवला पाहिजे . भूतकाळातील ती श्रेष्ठता व चेतना , त्यासंबंधी आमची आस्था या भरवशावर आम्हाला पहिल्यापेक्षा अधिक भव्य व अधिक दिव्य भारत निर्माण करायचा आहे .
   स्वामीजींना शंभर युवक हवे होते ! शंभर टक्क्यांना बदलणारे ! ' काही थोड्या लोकांनी तरी उठून उभे राहावे आणि म्हणावे की, परमेश्वराखेरीज आम्हाला अन्य ईप्सित नाही. जगासाठी धर्मजागरण करणे हेच आमचे जीवितकार्य. असा त्याग तुम्ही करू शकत असला, तर दृढपणे उभे रहा. हे धर्मयुद्ध आहे. यात शंभर योद्धे जरी कोसळले तर त्यांच्या हातीची ध्वजा घ्या आणि ती पुढे न्या. जो पडतो त्याने आपल्या हातीची ध्वजा दुसऱ्याच्या हाती द्यावी. ती काही कधी खाली येणार नाही. कोणीही पडले तरी ईश्वरी सत्ता अढळ राहणार आहे. '
      चरित्र्यसंपन्न, बुद्धीसंपन्न आणि लोकसेवेसाठी सर्वस्व समर्पण करणारे युवक हवेत. माझ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्राणही ओवाळून टाकण्याची सिद्धता असलेल्या आणि त्याद्वारे स्वतःचे आणि संपूर्ण देशाचे कल्याण करू शकणाऱ्या आज्ञांकित युवकांवरच माझ्या भविष्यातील आशा केंद्रित झाल्या आहेत. सर्वसामान्य मुले माझ्याकडे येतच असतात. त्यांच्या मुद्रांवर तेज नसते, त्यांच्या हृदयात उत्साहाचा अभाव असतो, त्यांची शरीरे दुर्बळ, कुचकामी असतात आणि मनात धैर्याचा लेशही नसतो. अशांकडून काय काम होणार? नचिकेताची श्रद्धा असलेले बारा युवक मला मिळाले तर या देशातील विचारांना आणि कार्याला मी नवी दिशा देऊ शकेन.
     विवेकानंद म्हणाले, ' आपल्या भविष्याचे शिल्पकार आपणच व्हा . भूतकाळात जे होऊन गेले त्याचे स्मरणही ठेऊ नका . असीम भविष्यकाळ आपल्यापुढे आहे . लक्षात ठेवा , तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द , केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असते . दुष्ट विचार आणि दुष्ट कृती या तुमच्यावर झडप घालायला वाघासारख्या टपलेल्या असतात . तसेच शुभविचार , शुभकृत्ये यांच्या अनंत शक्तीही तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, साहाय्य करण्यासाठी सदैव सिद्ध असतात . 
     सुशिक्षित तरुणांमध्ये कार्य करा, त्यांना एकत्र आणा, त्यांची संघटना करा. श्रेष्ठ त्यागातूनच श्रेष्ठ कार्य उभे राहते.माझ्या शूर, गुणी, मुलांनो ! आपल्या योजनांवर काम करण्यासाठी स्वतःची सर्व शक्ती वेचा ! एखादा चित्रकार चित्र रंगविताना इतका तन्मय होतो की, त्याला स्वतःचे सुद्धा भान राहात नाही . असा चित्रकारच श्रेष्ठ कलाकृतींना जन्म देऊ शकतो . ईश्वराशी जो योगबळाने एकरूप झाला तो आपले सर्व काम अत्यंत एकाग्रतेने करतो आणि व्यक्तिगत लाभाची काहीच अपेक्षा करीत नाही, अशा कर्मातून जगाचे नेहमी भलेच होत असते . वाईट काही होणे शक्यच नाही . गीता म्हणते की, आपली सर्वच कर्मे अशा रीतीने ' स्व ' ला विसरून झाली पाहिजेत . 
     नाव,कीर्ती,किंवा असल्या क्षुद्र गोष्टींच्या मागे लागू नका. झोकून देऊन काम करा. लक्षात ठेवा, ' सुके गवत जेव्हा दोरखंडात गुंतले जाते तेव्हा त्यामध्ये पिसाट हत्तीलासुद्धा बांधून ठेवण्याचे सामर्थ्य येते.   कोणत्याही एका ध्येयाचा ध्यास घ्या . त्यासाठी जीवन अर्पण करा . ते ध्येय इतके मोठे असावे, इतके उत्कट असावे, त्यापुढे अन्य सर्व गोष्टी विरघळून जाव्यात . त्याशिवाय इतर कशाला जीवनात जागाच राहू नये . वेळच राहू नये . 
    तुम्ही दिव्यत्वाचे अंश आहात . त्यामुळे श्रेष्ठतम गोष्टी तुमच्या चरणांशीच  आहेत . तुमचे स्वरूप इतके शक्तिमान आहे की, आकाशांतल्या सर्व तारकांचे तेज ओंजळीत घेऊन तुम्ही पिउन टाकाल . शक्तिमान व्हा ! सर्व अंधश्रद्धा दूर करा आणि मुक्त व्हा ! 
     गरीब , अज्ञानी आणि दलित यांच्या बद्दल सहानुभूतीचा आणि त्यांच्या उन्नतीसाठी सतत कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा वारसा मी तुम्हाला देत आहे . जे गरीब आहेत , जे दलित आहेत ,जे खालच्या जातीचे समजले जातात त्यांच्यासाठी कष्ट  करा . बलिदान करा .आपल्या संपूर्ण जीवनाचे बलिदान करा .बंधुनो ! आपण सर्वजण सतत कार्य करू या ! हि झोप घेण्याची वेळ नाही . भारताचे भविष्य आपल्याच कार्यावर अवलंबून आहे . भारतमाता आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहे . उठा ! जागे व्हा आणि आपल्या ह्या भारतमातेला तिच्या त्या शाश्वत सिंहासनावर पुनः विराजमान झालेली पहा .
      तिच्यात नवचैतन्याचा संचार होऊ द्या . आणि पूर्वी कधीही तिला लाभले नसेल अशा अपूर्व तेजाने ती परत तळपू द्या .
 हे वीर आत्म्यांनो, ज्यांना बेड्यांनी जखडून टाकले आहे, त्यांना मुक्त करण्यासाठी, जे दुःखाच्या भाराने लादले गेले आहेत त्यांचे ओझे कमी करण्यासाठी आणि जे अज्ञानाच्या घनघोर अंधारात बुडून गेले आहेत अशांची हृदये प्रकाशित करण्यासाठी पुढे चला ! ऐका ! वेदांत डंका पिटून घोषणा करीत आहे ' अभिः ' निर्भय बना . ईश्वराची हि पवित्र वाणी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्या हृदयाची तर छेडण्यास समर्थ होईल .
       स्वामी विवेकानंदांच्या समोरचे ध्येय स्पष्ट होते . ते स्वतः पाहताना, त्याचा परिसस्पर्श तरुणांना देताना ते म्हणतात, '  मी भविष्यात डोकावून पहात नाही.तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात उभे राहते. हि प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवासह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. शान्तिमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करूया ! '
  



Sunday, November 24, 2013

स्वातन्त्र्योत्तर युद्धकथा १

                स्वातन्त्र्योत्तर युद्धकथा १

सदैव सैनिका पुढेच जायचे,
न मागुती तुला कधी पहायचे ।
     शाळेमध्ये असताना कविता पाठ केली होती . आणि आज खरेच मागे न बघता पुढे जात होतो . १२ नोव्हेंबरची दुपार . वालोंग या चार हजार फुट उंचीवर असलेल्या ठिकाणी आम्ही होतो.  एकत्र येण्याचा हुकुम झाला आणि आहे त्या स्थितीत आम्ही धावत पळत एकत्र जमलो . ' आपल्याला ' ट्राय जंक्शन ' वर हल्ला करायचा आदेश आलाय . आत्ता ताबडतोप आपण निघत आहोत . चौदा हजार फुट उंचीवर जाऊन उद्या रात्री आपण हल्ला करीत आहोत . '
     ब्रिगेडियर म्हणाला खरा पण आम्ही मात्र त्याच्या कडे वेड्यासारखे बघत होतो . चौदा हजार फुट उंचीवर जाऊ आम्ही ! पण ताबडतोप हल्ला कसा शक्य आहे ? सगळे जण एकमेकांकडे बघत होते . काहीजणांनी शंका व्यक्त केली . हल्ला कसा शक्य आहे ? ब्रिगेडीयरने एकच वाक्य म्हटले . ' उद्या रात्री आपण हल्ला करीत आहोत . ' अधिकारयाची इच्छा म्हणजे शेवटी आज्ञाच ना !
     आम्ही चालायला सुरुवात केली . चारही बाजूला डोंगरांचे सुळकेच  सुळके.  देवदारांची झाडे . पायथ्याशी दाट, माथ्यावर विरळ होत गेलेली . शिखरांवर बर्फ साठलेले . सूर्यप्रकाशात चकाकणारे . खाली बघितले तर मधून मधून लोहित नदी दिसे . पांढरया रेषेसारखी . मन मोहून टाकणारे दृश्य . पण पाहता न येण्याजोगे . अक्षरशः उभा डोंगर ! पाय चुकला तर ? पूर्ण कपाळमोक्षच .
     रात्र झाली . काळोख पसरला . पण टोर्च पेटवायचा नाही . शत्रूला संशय येत कामा नये . चढाई मंदावली . पण सुरक्षितता वाढली . संपूर्ण रात्र आम्ही चालत होतो . पहाट झाली . शिखारांवरती सूर्याची किरणे पसरू लागली . अतिपूर्वेकडील ती किरणे . दरयामध्ये मात्र निळसर काळोखच ! भारतातले लोक मात्र अजून साखरझोपेत असतील !
      ट्राय जंक्शनला आलो . आमच्या दोन्ही बाजूंना ' यलो पिंपळ ' आणि ' ग्रीन पिंपळ ' या ठाण्यावर हल्ला करायचा .चिन्यांना जिकायचे . आमचे बाहू फुरफुरू लागले . पण हे युद्ध होते . येथे उतावीळपणा नडला असता . आम्ही आणि चीनी यांच्यात केवळ अर्ध्या किमीचे अंतर असेल . त्यांना आमची काहीच कल्पना नव्हती . ते आपले झाडे तोडण्यात,  खंदक तयार करण्यात गुंग झालेले . आपापसात मोठमोठ्याने बोलत असलेले .
     आता विश्रांती . थोडे खंदक,खड्डे यांची तयारी . मनात विचार चाललेला होता . इतक्यात वायरलेस वाजू लागला . ' हेलो, ब्रेव्हो, पापा रिपोर्ट माइन ओव्हर ' कमांडर ओफिसरने उत्तर दिले . ' रिपोर्ट ओव्हर ' सूचनांची देवाण घेवाण सूरु झाली . बातमी थडकली . आता लवकरच १० वाजता हल्ला करायचा . दिवसाच धडक द्यायची .
     आम्ही आमची घड्याळे लावून घेतली . हेवरसेक भरल्या . जड सामान उतरून ठेवले . अत्यंत सावधगिरीने, शत्रूला जराही सुगावा लागू न देता चालायला सुरुवात केली . कधी झटक्यात, कधी नागमोडी, कधी गुढग्यावर तर कधी कोपरांवर क्रव्लिंग करीत आम्ही पुढे सरकत होतो . वाटेत चीनी सैनिकांनी माईन्स, सुरुंग लावलेले नाहीत ना याचीही खात्री करून घ्यावी लागत होती . अगदी शत्रूच्या नाकासमोर जाऊन आम्ही ठाण मांडले .    
      भारतीय सैन्याचे एक वैशिष्ट्य आहे . इथे अधिकारी केवळ आज्ञा देत नाहीत . धुमश्चक्रीच्या वेळी ते सर्वात पुढे असतात . म्हणूनच ते युद्ध जिंकतात ना ?  मी थोडा पुढे जाऊन बघण्याचा प्रयत्न करू लागलो . सुभेदार गोविंदसिह माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करू लागले . मी त्यांना येऊ नका असे सांगत होतो . पण . . .  चिन्यांनी त्यांना पहिले आणि क्षणार्धात माशिन्गंस धडधडल्या . आग ओकू लागल्या . गोविंदसिह धारातीर्थी पडले होते . जणू ते म्हणत होते .  ' हे काय बंधू असतो जरी सात आम्ही । त्वस्थडीलीच दिधले असते बळी मी । '
     दुखः व्यक्त करायला वेळ होताच कोठे ? मी मागे संदेश पाठविला ' चीनी सावध झालेत . अधिकारयानी निर्णय घेतला आणि भारतीय सैन्याने आक्रमणाला प्रारंभ केला . अत्यंत विषम परिस्थिती . आम्ही एक तर चीनी पाच . त्यांची शस्त्रेही अत्याधुनिक . तरिहि आम्ही भारी पडत होतो . माझ्या प्लेट्यूनचा लान्सनाईक देवदत्त डोळ्यात खून उतरलेला . ' साब मुझे जाने दो ! चार-पाच चीनी तो मुझे मारनाही चाहिये । ' आणि धावला वेडा .
     इकडे मीही सरकत होतो . एका मोठ्या झाडाचा आधार घेत जात होतो . चीनी गोळ्या शरीराजवळून सुसाट जात होत्या . तोफांचे गोळे झाडांच्या फांद्या, छोटी झुडुपे तर पूर्ण उखडून टाकीत होत्या . आणि अकस्मात मार्याच्या टप्प्यात एक चीनी दिसला . संधी थोडाच सोडणार मी ? झाडली गोळी . चीनी मेला पण शत्रूला माझा सुगावा लागला . माझे झाड आगीने भाजले जाऊ लागले . गोळ्यांचा अक्षरशहः वर्षाव . त्या वर्षावाने झाडाची साल तर सोडाच खोडाचेही तुकडे माझ्या अंगावर पडू लागले . आजूबाजूने आवाज येऊ लागले ' अरे चवानसाब मर गया । अरे चवानसाब मर गया_ '
     युद्धाचे काही संकेत असतात . पुढे नाही जाता आले तरी आहे तेथे दृढ टिकून राहायचे . मोर्चा सोडायचा नाही . आम्ही तसेच केले . आणि ' यलो पिंपळ ' वरून आम्ही चिन्यांना हुसकून लावू शकलो . आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे ठाणे आम्ही तोफखान्याची मदत न घेता जिंकले . बिरबल म्हणत असे ' शस्त्र कोणते श्रेष्ठ ? जे वेळेवर हाती मिळेल ते ! '  ' नेपोलियन नेहमी सांगे ' युद्धात शस्त्र लढत असते, पण त्यापेक्षा खरे लढते ते मन, हृदय ! ' मला कवीच्या त्या फुलाची आठवण आली  
मुझे तुम तोड लेना वनमाली,
उस पथ पर देना फेंक ।
मातृभूमी पर शीश चढाने,
जिस पथ जाये वीर अनेक ।। 
    
     
     





Saturday, January 19, 2013

गीत विवेकानंद - १

११
हे वीर विवेकानंद
हे वीर विवेकानंद हिंदुयशमूर्ती
हे युवक प्रवर तू युवहृदयांची स्फूर्ती।।धृ।।
दास्यात पाहुनी विश्वधर्मजननी ही
तू क्षुब्ध सिंहसा व्याकुळ अंतर्यामी
मुक्तीचा तिचिया ध्यास तुला दिनराती।।१।।
शत-आघातांनी कुंठीत मूर्च्छित झाली
ती हिंदुचेतना फिरूनी तू चेतविली
तिज उन्नत मस्तक निर्भय केले जगती।।२।।
स्मरतात तुझे ते घनगर्जितसे शब्द
मन वज्र हवे अन मनगट ते पोलाद
जग जिंकायाची ईर्षा दाटो चित्ती।।३।।
तव अमृतवाणी हाक देत आम्हाते
रे अतुलबलस्वी करू हिंदुराष्ट्राते
युवशक्ती हवी मज कार्य शरण पुरूषार्थी।।४।।
जी जीवनपुष्पे सतेज नवरक्ताची
स्थापावा त्यांनी धर्म-आत्म अर्पुनी
त्यानेच अर्चना होत राष्ट्रदेवाची।।५।।