Saturday, January 19, 2013

विवेकानंदांची गोवा भेट

पहाट होत होती. क्षितिजावर भगवी उषा पसरत  होती. गोमंत पर्वता आडून उदीयमान हिरण्यगर्भ   वाकुल्या दाखवत प्रकट होत होता. उत्तर रात्री कधीतरी पडलेल्या पावसाने न्हालेला  हिरवागार  झाडोरा  अजूनही ठिबकत होता. थेंबामधून सूर्यकिरणांना परावर्तीत करीत  सहस्र रश्मी बनवत होता. आगगाडी आपल्या संथ लयीत चालली होती. नागमोडी वळणे घेत, बोगदे पार करीत उतरण उतरत होती. दोन्ही बाजूंना लावलेली इंजिने ठराविक वेळी आपापल्या  शीळा  फुंकीत  होती. डोंगर  दरयानमधून त्यांचा मंद प्रतिध्वनी येत  होता. विवेकानंदांनी निमिषभर डोळे झाकले, उघडले. आणि..... आणि ..... उजव्या खिडकीतून टपकन रानफुलाची  पाकळी टपकली. गोव्याच्या भाषेत सांगायचे म्हणजे कौल झाला होता. 

गोव्याला येण्यामागे  स्वामीजींच्या डोळ्यासमोर दोन  प्रमुख उद्देश्य   होते. पहिला देवदर्शन ! दक्षिण काशीतल्या देवतांचे दर्शन ! आणि दुसरा ख्रिश्चन मताचा अभ्यास! स्वामीजींचा मुक्काम बेळगावला होता.
बेळगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर श्री. विष्णुपंत  शिरगावकर  यांच्याशी  त्यांचा  परिचय  झाला.  बोलता  बोलता गोव्याचा विषय निघाला. स्वामीजींच्या मनात गोव्याला जायचा विचार आहे हे विष्णुपन्तांच्या
लक्षात आले.स्वामीजींच्या प्रवासाची व्यवस्था करायचे त्यांनी ठरविले. मडगाव शहरामधील विद्वान सद्गृहस्थ  श्री.  सुब्राय नायक यांच्याशी त्यांचा परिचय होता. विष्णूपंतानी  सुब्राय नायकांना पत्र  पाठविले. स्वामीजींचा परिचय व उद्देश्य लिहून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. विविध विषयांचे सखोल ज्ञान, समाजसेवेची तळमळ व उदीयमान पत्रकारिता यांचा व्यासंग अशा बहुश्रुत सुब्रायजीनी त्यांची विनंती सहर्ष स्वीकार केली.

 श्री. सुब्राय नायकांचे घराणे  हे मडगावातील प्रमुख प्रतिष्ठित  घराणे. पोर्तुगीज अत्याचार, बाटवा बाटवी, द्वेषमूलक कायदेकानून यांच्यातून मार्ग काढीत स्वधर्म रक्षण करणारे. गोव्यात हिंदू  धर्मावरील  पहिला पोर्तुगीज आघात सासष्टी तालुक्यात झाला होता. रायतुरचा  किल्लेदार  दियोगु  रुद्रीगीश  याने   साडेतीनशे देवळांचा विध्वंस केला होता.मडगांव शहरात धार्मिक स्थळाची उणीव भासू लागली.  साहजिकच धर्मप्रेमी नायक कुटुंबीयांनी  मडगावचे  ग्राम दैवत श्रीदामोदार  यांच्या पूजा अर्चेसाठी आपल्या घरातील एक मोठी खोली आज ज्याला साल म्हणतात, ते हिंदुना उपलब्ध करून दिले.  धार्मिक  विधींना सुरुवात झाली. आजही श्रीदामोदाराची नित्यपूजा तेथे मोठ्या  भक्तिभावाने केली जाते.

२७ ओक्टोबर १८९२ ! मडगावचे रेल्वे स्टेशन ! शेकडो लोकांचा जमाव तेथे जमला होता. आतुरतेने स्वामीजींची वाट पहात उभा होता.  मडगांव मधील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत श्री सुब्राय नायक स्वामीजींच्या स्वागताला स्वतः उपस्थित होते. रेल्वेचे आगमन झाले. स्वामीजी खाली उतरले. काषाय वस्त्रधारी ते  तेजः पुंज धिप्पाड व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर  विद्वत्तेचे तेज,  धृढनिश्चयी मुद्रा, परतत्वाचा वेध घेणारी नजर ! ते आले  त्यांनी  पाहिले आणी त्यांनी  जिंकले हे वेगळे सांगायला हवेय ?

श्री सुब्राय नायक यांनी स्वामीजींना आपल्या  घोडा गाडीत  बसविले.  मोठ्या सन्मानाने मिरवणुकीने आपल्या घरी नेले. कोंब वाड्यावरील आपल्या पिढीजात घरात त्यांनी स्वामीजींच्या राहण्याची व्यवस्था केली. सालाशेजारची खोली त्यांना देण्यात आली आणि स्वतः जातीने त्यांची सोय सुविधा  ते बघू लागले.
स्वामीजींची ध्यान धारणा, चिंतन, देवदर्शन,भेटीगाठी  यांची व्यवस्था करू लागले. प्रतिष्ठित लोक भेटायला येत. चर्चा करीत. भारावल्या स्थितीत पूर्ण संतुष्ट होऊन घरी जात. धर्म, मीमांसा, षड्दर्शने, लेखन,  समाजसेवा  विषयांची  समा  जुळल्याने  श्रोत्यांच्या  दृष्टीने ' सोनियांचे दिनु  बरसे अमृताचे घनु ' ठरल्यास नवल ते काय!

देवदर्शनासाठी स्वामीजी  फोंड्याला गेले. कवळेला श्रीशान्तादुर्गेचे दर्शन त्यांनी  घेतले. गोव्याच्या मातीला संगीताचा वास आहे. साहजिकच  इथे येणाऱ्याचा श्वास लयकारणारच ! सहजपणे स्वामीजी  देवळात  मांडी घालून बसले. जगदम्बेशी तद्रूप  झाले. त्यांना दुर्गा आठवली. विश्वजननी  कालीमातेचे भजन  ते गावू लागले. देवळात देवदर्शनाला आलेली  भक्त मंडळी सावरून बसली. स्वामीजींच्या मधुर आणि पहाडी आवाजाने ती मंत्रमुग्ध झाली. क्षणकाल का होईना आपल्या आराध्याला, शांतादुर्गा  देवतेला मूळ कालीरुपात अनुभवू लागली.

स्वामीजी मंगेशीला गेले. फोंड्याचा सगळाच भाग नितांत सुंदर. हिरवीगार शेते, पाचविचार कुळागरे! आणि त्याच्या साथीला त्या हिरवाईत, पाचुई कोंदणात वसवलेली देवालये. स्वामीजींनी श्रीमंगेशा समोर धृपद गायला. आपल्या मधुर रागदारीने उपस्थिताना तृप्त केले. जवळचे गाव
म्हाड्डोळ !  श्रीम्हालसा देवीचे स्वामीजींनी दर्शन घेतले. देवीसमोर त्यांनी एक सुंदर ख्याल गायला.
ते मडगावी परतले.  सालातही त्यांनी श्रीदामोदारासमोर एक चीज आळवली. तब्बल पाऊण तास ते ती चीज विविध रागातून गात होते. गोव्यातील संगीत दर्दिना आश्चर्यचकीत करीत होते.

पर्वतावर याच काळात लयसूर्याचा  उदय होत होता. खाप्रुमाम पर्वतकर ! वादनातील एक  अनोखा   चमत्कार  ! एका पायाने त्रिताल, दुसऱ्या पायाने झपताल, एका हाताने लय, दुसऱ्या हाताने चौताल
धरून तोंडाने सवारी म्हणत एकाच वेळी समेवर येणारा हा लयभास्कर . सुब्रायबाबानी खाप्रूमामांना बोलवून आणले. स्वामिजीसमोर त्यांचे वादन झाले. तरुण खाप्रूला वादनासंबंधी सांगताना स्वामीजी म्हणाले, ' लाकडी खोक्याच्या कडेवर बोटांनी वाजवत जसा आपण आवाज काढतो, तसा आवाज चामड्याच्या वरच्या थरातून काढला आला पाहिजे. '  खाप्रूला हे पटेना. त्याला वाटले स्वामीजी आपली थट्टा करतात. हलकेच तसे ते म्हणालेही. स्वामीजी आसनावरून उतरले. बैठक मारून त्यांनी तबल्यावरून  हात फिरविला. त्यांची बोटे तबल्यावरून फिरू लागली. दैवी आवाज सालात घुमू लागला. आपल्या वादनाने उपस्थितांना आ वासायला लावणाऱ्या  कलावंत खाप्रूचा वासलेला आ पहाण्याचे  भाग्य आज मिळाले होते. स्वामीजीच्या वादन कौशल्याने सगळेजण  थक्क झाले होते. खाप्रू मामानी स्वामीजींना साष्टांग नमस्कार घातला. त्यांची क्षमा मागितली. आपल्या  उमेदीच्या,  उभारीच्या  अत्यंत तरुण वयात स्वामीजीशी संबंध येण्याचे भाग्य खाप्रू मामांना लाभले.

हिंदुत्व हा मानवी जीवनाचा प्राण ! मानवी जातीला मार्ग दाखविणारा  पथ  परीचायक  दीपस्थम्भ !  शतकानुशतके अनथक चालत आलेला. हल्लीच्या काळातील काही दुराग्रही पंथांनी त्याच्यावर आघात करायला सुरुवात केली होती. माझे मत खरे आहे, असे म्हणायला हरकत नाही. पण दुसरी मते, अन्य विचार खोटे आहेत असे प्रतिपादन केले जात होते. फेनेटिक उन्माद पद्धतशीररित्या पसरविला जात होता. याचाच एक शीर्ष बिंदू म्हणून शिकागो येथे सर्वधर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिश्चन मत जगावर लादण्याच्या
योजनेचाच तो एक भाग होता.

खंडन-मंडण यांची फार मोठी परंपरा लाभलेल्या या देशात परमताचा विचार, अभ्यास सहज केला जातो.
स्वामीजी हाच प्रमुख उद्देश्य घेऊन गोव्यात आले होते. श्री. सुब्रायबाबाशी आपला मानस त्यांनी  व्यक्त  केला. मडगाव पासून ७ किमी. अंतरावर  असलेल्या प्राचीन रायतूर किल्ल्याचे रुपांतर पोर्तुगीजांनी सेमिनारीत केले होते.  ख्रिश्चन मतप्रसार करणारे पंथप्रसारक, पाद्री तेथे तयार केले जातात. तिथल्या ग्रंथालयात ख्रिस्ती पंथविषयक अनेक उत्तमोत्तम पुस्तके होती . अत्यंत दुर्लभ  अशी  प्राचीन  हस्तलिखिते होती. लेटीन ग्रंथ होते. या पुरातन  ग्रंथांमधून ख्रिश्चन पंथाचा इतिहास व तत्वज्ञान यांचा अभ्यास  करणे. गोव्यातील समाजमनावर  झालेला धर्मपरिवर्तनाचा प्रभाव जाणून घेणे. आणि सात  किलोमिटरवर  जावून  मिळविलेल्या  माहितीच्या  आधारे  सात समुद्रापलीकडे  जाऊन  अर्वाचीन हिदुत्वाची आश्वासक  सिंहगर्जना  करणे.

मडगावचे सुप्रसिद्ध वकील श्री. जुझे फिलीप आल्वारीस यांना सुब्रायबाबानी आपल्या  घरी  बोलाविले. स्वामीजींचा  परिचय करून दिला.  त्यांचा मानसही बोलून दाखविला. स्वामिजींशी झालेल्या अल्पशा भेटीत, त्यांच्याशी झालेल्या चर्चेत  श्री. आल्वारीस अत्यंत प्रभावित झाले होते.  त्यांनी ताबडतोप सेमिनारीतील आपल्या एका प्रोफेसर मित्राची भेट घेतली. स्वामी विवेकानंदांची रायतुरच्या सेमिनारीत दोन दिवस राहण्याची सोय केली. ग्रंथालायातले प्राचीन ग्रंथ दाखविण्याची व्यवस्था केली.

स्वामीजी रायतूरला गेले. तिथल्या प्राचीन ग्रंथांचे ते अध्ययन करू लागले. हस्तलिखिते चाळू लागले. काही टिपणेही त्यांनी काढली. तेथील विद्यार्थी, शिक्षक, पादरी, त्यांचे प्रमुख स्वामीजींना कुतुहलाने बघत. फुरसतीच्या वेळी त्यांच्याबरोबर वार्तालाप करीत. विविध प्रश्न विचारीत. स्वामीजीची वेशभूषा, प्रगाढ ज्ञान, तीव्र स्मरणशक्ती, चौफेर व्यासंग यामुळे लोखंडाने चुंबकाला चिकटावे तसे सर्वजण आकर्षिले जात. शेकडो विद्यार्थी तिथे निवासाला असत. येशूच्या धर्माचे सार त्यांनी या विद्यार्थ्यासमोर ठेवले. एक भगवा संन्यासी येतो काय ! चारदोन पुस्तके चाळतो काय ! आणि वर्षानुवर्षे पंथ कोळून प्यालेल्याना त्यांच्याच पंथाचे मर्म सांगतो काय ! सगळेच स्तंभित करणारे.

साहजिकच श्री. सुब्राय नायकांच्या घरी विद्वानांचा ओघ सुरु झाला. ख्रिश्चन मंडळीही बरीच येऊ लागली. प्रतिष्ठित वकील,, बेरिस्टेर, जज, नायकांकडे येत. दूरदुरून पादरी मंडळीही येई.  स्वामिजीकडे मनमोकळेपणाने संवाद करीत. लेटीन, इंग्रजी, फ्रेंच अशा विविध भाषात हा संवाद चाले. स्वामीजीची  उत्तर देण्याची पद्धती त्यांना भावे. ते तिचे कौतुक करीत. सगळ्या धर्मांचे सखोल अध्ययन केलेला, बहुश्रुत, मेधावी असूनही अत्यंत साधा असा हिंदू  संन्यासी त्यांनी पहिल्यांदाच पहिला होता.

बघता बघता पंधरवडा उलटला. स्वामीजींची पुढच्या प्रवासाची वेळ जवळ आली. श्री. सुब्राय नायकांनी स्वामीजींच्या गौरवपर एका सभेचे आयोजन श्रीदामोदराच्या पटांगणात केले. उपस्थित वक्त्यांनी विवेकानंदांचे गुणवर्णन केले. त्यांच्या नियोजित कार्यात,सर्वधर्मपरिषदेत त्यांना यश प्राप्त होवो अशी कामना व्यक्त केली. बरीच पादरी मंडळीही या सभेस हजर होती.

श्री. हरिपद मित्र यांना पाठविलेल्या पत्रांत स्वामीजी लिहितात,  '' मी येथे सुखरूप येऊन पोहोचलो.येथे मी पणजी शहर पाहिले, तसेच काही खेडीही पाहिली. जवळपास असलेली काही देवळेही पाहिली. तिकडून मी आजच परतलो. गोकर्ण- महाबळेश्वर आदि स्थानांना भेट देण्याचा माझा मानस मी अद्याप सोडून दिलेला नाही. उद्या सकाळच्या गाडीने मी धारवाडला जाण्यासाठी निघेन.... पणजी हे टुमदार आणि मोठे स्वच्छ शहर आहे. येथील बहुतेक ख्रिस्ती लोक साक्षर आहेत. प्रायः सर्व हिंदू अशिक्षित आहेत. ''

श्री सुब्राय नायकांनी स्वामीजी कडे त्यांचे एक छायाचित्र मागून घेतले. आजही सालामध्ये त्याचे परिवर्धीत रूप आपल्याला पहायला मिळते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात स्वामीजी धारवाडला जायला निघाले. रेल्वे स्टेशनवर त्यांना निरोप द्यायला हिंदू तसेच ख्रिश्चन समाजातील प्रतिष्ठित लोक शेकडो नागरिकांसह आले होते.  रेल्वे दिसेनाशी होईपर्यंत साश्रू नयनांनी हात हलवत निरोप देत होते.

Sunday, April 1, 2012

सीता मला दिसलीच नाही.

प्रभू श्रीरामांनी सीतेला आज्ञा दिली.
सीतेने अग्निदिव्य करायचे ठरविले.
पृथ्वीने सीतेला आपल्यात सामावून घेतले.

उर्मिला आपल्या महालात बसलेली होती.
रामाच्या एकटेपणावर काय करावे बरे !
उर्मिलेने एक प्रसिद्ध चित्रकार बोलावला.
त्याच्याकडून सीतेचे देखणे चित्र काढून घेतले.
हुबेहूब प्रतिसीता दिसत होती ती.

उर्मिल चित्र घेउन रामाच्या महालात गेली.
रामाला तिने चित्रावरील पडदा दूर करायची विनंती केली.
रामाने तस्विरीचे अनावरण केले.
आणि क्षणार्धात राम आपल्यातच हरवले.

काही वेळ जाऊ दिल्यावर उर्मिलेने रामाला विचारले,
" चित्र कसे आहे. "
राम म्हणाले, " सीता दिसल्याबरोबर मी तिच्या आठवणीत हरवून गेलो.
चित्रातली सीता मला दिसलीच नाही. "

Thursday, October 6, 2011

विजयादशमी !

आज विजयादशमी !
भगवान श्रीरामांचा रावणावर विजय मिळविलेला दिवस.
रावणाचा संहार करणारे राम प्रचंड पराक्रमी होते.

सीतेला सोडवून आणण्यासाठी राम लंकेत जात होते.
समोर प्रचंड  हिंदू महासागर पसरलेला.
आपल्याला वाट दे अशी विनती रामाने  त्या सागराला केली.
तीन दिवस झाले. सागर ऐकत नाही. राम रागावले.
' विनती ऐकत नाही काय ? आता तुला अटवूनच टाकतो. '
आपला विजयाकांशी बाण त्यांनी धनुष्यावर चढवला आणि.....
सागर समोर साक्षात प्रगट झाला.

Sunday, September 18, 2011

ज्ञानेश्वरी नमोस्तुते !

आज भाद्रपद कृष्ण षष्ठी. नेवाशात आज युगांतरीची धामधूम चालली होती.
श्रीमोहीनिराजांचे देवालय माणसांनी  ओसंडून वाहत होते. आज ज्ञानेश्वरीची लेखनसीमा !

ज्ञानेश्वर थांबले. सच्चीतानंदबाबांनी लेखणी खाली ठेवली.
सगळ्यांचे चेहरे आनंदाने ओसंडून वाहत होते. कृतकृत्यतेचा क्षण  होता तो.

आता काय  ? ग्रंथराज ज्ञानेश्वरी  लिहिलीय ज्ञानदेवांनी !
ज्ञानेश्वरांची  मिरवणूक  काढायची काय ?
समाजाच्या उत्साहाला उणे काय असणार ! साधी नाही अंबारीतून मिरवणूक काढायची.
लगबग सुरु झाली. सजवलेला हत्ती आणला गेला. देवालयाच्या प्रांगणात उभा राहिला.

लोकांनी ज्ञानराजांना अंबारीत बसण्याची विनंती केली.
ज्ञानेश्वरांनी नकारार्थी मान हलविली.
लोक आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, ' मग मिरवणूक नाही काढायची ? '
ज्ञानेश्वर उद्गारले,  " अरे, मिरवणूक काढायची तर ! उत्साहात काढायची.
टाळ मृदुंगाच्या गजरात काढायची.  पण त्यात मी नाही बसणार !
अंबारीत बसणार भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी "


Saturday, August 20, 2011

इन्द्र्पूजा सोडा, गोवर्धन पूजा धरा !

प्रत्येक समाजाच्या जीवनात अशी निर्णायक वळणे येतात .
त्या त्या वेळी ते ते महापुरुष योग्य असा निर्णय घेतात.
समाजाच्या योगक्षेमाची चिंता वहातात. त्यामागे आपली तपस्या पणाला लावतात.
म्हणूनच त्यांना  महापुरुष म्हणतात.

इंद्र्पूजेचा सण जवळ आला  होता. गोकुळात सगळीकडे धामधूम चालली होती.
सगळेजण आपापल्या पद्धतीने सणाची तयारी करीत होते.

बालगोपालात तर सण म्हणजे उत्साहाचे वातावरण.
बाल गोपालात सणाची चर्चा सुरु झाली.
बरोबर कान्हा ! पण गप्प गप्प ! विचारात बुडालेला.
" काय झाले रे ? " सगळे गोपाल विचारू लागले.

आणि कान्हाचे डोळे चमकले. एक वेगळेच तेज आले तिथे.
' गोवर्धन महाराज की जय ' तो गर्जला !

" मंडल " कान्हाने आज्ञा दिली. सगळे  गोल उभे राहिले.
कान्हा बोलू लागला, " सवंगड्यांनो, दरवर्षी आपण इंद्रदेवाची पूजा करतो.
पण हा आपला खरा देव आहे काय ? आपला खरा देव आहे हा गोवर्धन.
जो रोज आपल्याला  धारण करतो. आपल्याला मुक्तपणे भटकायला देतो.
आपल्या गायीगुरांना चारा देतो. जळणाला, इमारतीला लाकूड देतो.
ज्यामुळे गोकुळात पाऊस येतो. गोकुळ सुसंपन्न, वैभवी बनवितो.
इंद्रापेक्षा हा गोवर्धन हाच खरा देव. बोला " गोवर्धन महाराज की जय "

गोकुळात गोवर्धन पूजा अनोख्या डामडौलात पार पडली.
खऱ्या कृतज्ञतेची पूजा ! पण !

इंद्राला समजले. आपल्याला टाळून गोवर्धनाची पूजा केली गोपालांनी !
गोपाल मातले काय ? धडा शिकवायलाच हवा. आणि........
पाऊस सुरु झाला. खरा मुसळधार ! गडगडाट, विजांसह ! अविश्रांत !
गोकुळात पाणीच पाणी  होऊ लागले. महापूर! पाऊस थांबायचे नाव नाही. 
सगळ्यांच्या लक्षात आले इंद्रदेव कोपलाय. तो वेड्यासारखा कोसळतोय.
सगळे कान्हाला दोष देऊ लागले . बोलती कोण बंद करणार ?
पण कान्हाच तो. विचार केला नसेल का त्याने ?

सकाळी सगळे गोकुळ जमा झाले. गोवर्धानाच्या पायाशी गेले.
गोवर्धनाची प्रार्थना करीत ते त्याला म्हणाले,
' देवा, सत्याला स्मरून आम्ही तुझी पूजा केली.
यात आमचे चुकले काय ? आम्ही योग्य तेच केले.
या सत्याचे वहन करण्याची शक्ती आम्हाला दे महाराजा ! ' आणि ..........

आपली प्रतिरूप असलेली काठी त्यांनी उगारली, उंचावली !
गोवर्धनाच्या तळाशी घातली. कान्हाने काय केले ? गोवर्धनाचा जयजयकार केला.
आपली करांगुली उंचावली. गोवर्धनाकडे निर्देशली.
आणि हा हा म्हणता गोवर्धन उंचावला गेला.
कुठला पाऊस आणि कुठला महापूर ! " गोवर्धन महाराज की जय "

Thursday, August 18, 2011

तर लोकपालाची गरजच नव्हती !

सकाळची वेळ ! शिबू विद्यालयात गेला होता.
उठणे, नाश्ता, तयार होणे, नेहमीपेक्षा जास्त सतावले आज शिबुने.
वडिलांना  सांगायचे आज. 
पण मग मस्ती मुलांनी नाही करायची मग कोणी ?  

आई शिबुच्या खोलीत गेली. अस्ताव्यस्त पडलेला  पसारा आवरू लागली.
अकस्मात आईचे लक्ष त्याच्या कपाटाकडे गेले. कपाटातून मुंग्या येत होत्या.
आईने कपाट उघडले. शिळ्या झालेल्या पाचसहा चपात्या पुस्तकांमागे लपल्या  होत्या.
मुंग्या त्या चपात्यांना लागल्या होत्या .

शिबू शाळेतून आल्यावर आईने त्याला विचारले.
शिबू खरे सत्य बोलायचा. गहिवरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला., 
" आई तू रोज मला चपात्या द्यायचीस ना.
त्यातील दोन चपात्या मी त्या समोरच्या आईला ( भिकारणीला ) देत असे.
गेले दोन दिवस ती दिसतच नाहीये. कुठे गेली असेल ग ती ? "

आईने त्याच्या पाठीवरून हात फिरविला.
आपली  रेशमी शाल त्या भिकारणीच्या अंगावर टाकून स्वतः उघडा पडणारा
शिबू तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. टचकन दोन कढत अश्रू शिबुवर पडले.

सत्याचे प्रयोग करणारे  गांधी  सत्याला चिकटून जनभावनेला मान देते ,
शिबू ( सुभाषचंद्र बोस ) कॉंग्रेसचे  अध्यक्ष झाले  असते तर..........
लोकपाल विधेयकाची गरज पडली असती काय ?